शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!
By Admin | Updated: August 7, 2016 01:04 IST2016-08-07T00:15:27+5:302016-08-07T01:04:02+5:30
नैसर्गिक आपत्ती : जिल्ह्यात ४ मृतांच्या नातेवाइकांना १६ लाखांची मदत

शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!
सातारा : चालू वर्षीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्युमुखी पडलेल्या ४ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने १६ लाखांची मदत केली आहे. एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मृताचे शवविच्छेदन करण्यास विरोध केल्याने मदत मिळू शकलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून केला जाणारा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. पुरात वाहून गेलेली व्यक्ती, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज अंगावर पडून मृत्यू, दरड कोसळून मृत्यू आदी घटनांमध्ये ही मदत दिली जाते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते.
चांभारवाडी, ता. फलटण येथील सोमनाथ उत्तम चतूर यांचा दि. ३ जून २०१६ रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. रामवाडी, ता. जावली येथील अशोक विठ्ठल पाडळे यांचाही वीज पडून दि. ८ जून २०१६ रोजी मृत्यू झाला.
ऐनाकवाडी, गोकूळ तर्फ हेळवाक, ता. पाटण येथील लक्ष्मण शंकर कदम यांचाही दि. १० जुलै २०१६ रोजी ओढ्याच्या पुलात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील बाबासो कोंडिबा मकानदार यांचा दि. १३ जुलै रोजी दक्षिण मांड नदीच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या सर्वांना जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ४ लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
दरम्यान, अंबवडे (ता. खटाव) येथील निखिल संभाजी पवार यांचा दि. ७ जून २०१६ रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनच झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही. तसेच विजापूर, कर्नाटक येथील लक्ष्मण कापू राठोड यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कर्नाटक राज्यातील असल्याने संबंधित राज्यामार्फत मदत मिळण्यासाठी हे प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सहा जनावरे दगावली. त्यापैकी दुधाळ जनावरांना प्रत्येकी ३० हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे.
मृत जनावरांच्या मालकांना दीड लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. १७० घरांची पडझड झाली. एक झोपडी व ११ जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. पूर्णत: पडझड झालेल्या २ घरांपैकी एक घर मदतीसाठी पात्र ठरले आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या ६१ घरांपैकी ४४ घरे मदतीस पात्र ठरली आहेत. अंशत: पडझड झालेल्या १६९ कच्च्या घरांपैकी ७१ घरे मदतीला पात्र ठरली आहे. बांधकाम विभागातर्फे संबंधित नुकसानीची तपासणी केली जात आहे. पात्र ठरलेल्यांपैकी आणखी काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे. चालू पावसाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे ९७ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
प्रेत सापडले नसल्याने मदत प्रलंबित
लिंब, ता. सातारा येथील कृष्णा नदी पुलावरून रवींद्र भरत जाधव (रा. गोवे व जिहे, ता. सातारा) येथील रघुनाथ महादू जाधव हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. वेंगळे, ता. महाबळेश्वर येथील शंकर भिवा संकपाळ यांचा ओढ्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. पोलिस पंचनामा व शवविच्छेदन अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही.
२० कुटुंबे स्थलांतरित..
फलटण तालुक्यातील जाधववाडी (साठे) या गावातील नीरा नदी काठावरील एकूण २० कुटुंबांतील ५८ व्यक्तींचे पुराच्या पाण्यामुळे इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.