आधुनिकतेच्या काळात पारंपरिकतेचा पडलाय विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:32+5:302021-02-07T04:36:32+5:30
कुडाळ : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपली शेती पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. देशाची अधिकतम लोकसंख्या ही शेतीवरच ...

आधुनिकतेच्या काळात पारंपरिकतेचा पडलाय विसर!
कुडाळ : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपली शेती पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. देशाची अधिकतम लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे. निसर्गाच्या वैविध्यामुळे विविध विभागांतील शेती अवजारांची बनावट गरजेनुसार वेगवेगळी पाहायला मिळते. उपजीविकेसाठी ग्रामीण भागातील शेतकरी बैल, घोडा, रेडा या प्राण्यांचा उपयोग करून पारंपरिक शेती करीत होता. मात्र, कालानुरूप यात बदल होत गेला. शेतीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागल्याने पूर्वीची शेती अवजारे आज शेतीतून हद्दपार होऊ लागली आहेत.
पूर्वी शेतीसाठी पारंपरिक अवजारांचा वापर होत आहे. कुळव, पाभर, पाटोळे, रेगाडे, मोगणा, नांगर, तिफण, आदी शेतीच्या अवजारांच्या मदतीने मशागत व पेरणीची कामे केली जात होती. भल्या पहाटे शेतकरी आपली बैलजोडी घेऊन शेतात जाताना बैलगाडीच्या घुंगरांचा आवाज कानी यायचा. आता ग्रामीण भागातील परिस्थिती बदलली आहे. शिवारात सर्जा-राजाच्या जागी यांत्रिक शेती होत आहे. आधुनिकतेच्या काळात बैलजोड्याही कमी झाल्या आहेत. पारंपरिक अवजारांची जागा आता यंत्राने घेतली आहे. शेतीच्या पद्धतीत सुधारणा झाली असून, त्याकरिता नवनवीन शोध आणि आधुनिक साधनांची मदत होत आहे. कमी वेळात शेतीचे जास्तीत जास्त काम होण्यासाठी शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होऊ लागला आहे.
शेतीची बहुतेक कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. अगदी पेरणीपासून ती सर्वच कामे होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होऊ लागली आहे. गावात पूर्वीसारखे बैलजोडी पाळणारे कमीच आहेत. वाहतुकीचे साधन म्हणून बैलगाडीचा रुबाब आणि गाडीवान आता यांत्रिकीकरणाचा भाग झालेला दिसत आहे. पारंपरिकतेचा विसर होत शेतीसाठी आधुनिक साधनांचाच जास्त वापर होऊ लागला आहे.
चौकट..
युवावर्गाचा कल आधुनिक शेतीकडे
सध्या पारंपरिकतेचा बाज संपत चालला असून, शेतकरीही आधुनिक झाले आहेत. युवावर्गाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आधुनिक शेतीकडे त्यांचा अधिक कल पाहायला मिळत आहे. पारंपरिक अवजारांची जागा आता अडगळीच्या कोपऱ्यात असून क्वचितच प्रसंगानुरूप यांचा उपयोग होत आहे.