वनखाते-पालिकेत टोलवरून जुंपली!

By Admin | Updated: November 5, 2015 23:56 IST2015-11-05T22:35:05+5:302015-11-05T23:56:27+5:30

महाबळेश्वरातील पेच : गुरेघर येथील वनविभागाच्या टोलला पालिकेचा विरोध

In the forest-park, weighed in toll! | वनखाते-पालिकेत टोलवरून जुंपली!

वनखाते-पालिकेत टोलवरून जुंपली!

महाबळेश्वर : वनविभागाची संयुक्त वन व्यवस्थापन समिती व पालिका यांच्यात टोलवसुलीवरून जुंपली आहे. वन व्यवस्थापन समित्या पाच ठिकाणी वसुली करत होत्या. त्याऐवजी वनविभागाने गुरेघर येथे एकाच ठिकाणी सुरू केला. त्यामुळे पालिकेची वसुली धोक्यात आली आहे. पालिकेने नव्या टोलनाक्याला विरोध केला आहे. विरोधामुळे वनविभागाने गुरेघर येथीलटोलनाक्यावरील वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. सुमारे पंधरा ते अठरा लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. ब्रिटिशकाळापासून महाबळेश्वर नगरपरिषद येथे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून प्रवासी कर वसूल करते. पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण व स्वच्छतेवर पालिका खर्च करते.
काही वर्षांपूर्वी वनविभागाने पालिकेकडे असलेल्या सर्व पॉइंट आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून तेथे देखभाल व दुरुस्ती करण्यास पालिकेला बंदी घालण्यात आली. पालिकेला बंदी आणि वनविभागाकडे निधीची कमतरता, यामुळे अनेक पॉइंटची दुरवस्था होऊ लागली. पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत असली तरी वनविभागाच्या जाचक अटींमुळे पालिका काहीही करू शकत नव्हती. काही वर्षांपूर्वी वनविभागाने त्यांच्या हद्दीतील पॉइंट दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी टोल वसुली सुरू केली. प्रथम एका पॉइंटवर सुरू झालेली वसुली आता पाच पॉइंटवर सुरू झाली आहे. यामुळे पाचगणी व महाबळेश्वर येथे मिळून दहा टोल नाके झाले. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे गेल्या महिन्यात महाबळेश्वरमध्ये आले होते. वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांना पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या टोलनाक्यावर होणारी वसुली एकत्र करण्याचे आदेश दिले. व ही वसुली दि. १ नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक बोलविली होती; मात्र त्या झाल्याच नाहीत. त्यामुळे वनविभाग व पालिकेत समन्वय झाला नाही. दुसरीकडे वनविभागाने टोल एकत्रिकरणाच्या जोरदार हालचाली सुरू केल्या. पाच वन व्यवस्थापन समित्यांची एक महासमिती स्थापन केली. या समितीने गुरुवारी पालिकेच्या निर्णयाची वाट न पाहता गुरेघर येथे वसुलीही सुरू केली. पाचगणीत टोल भरून आल्यानंतर पर्यटकांना वनविभागाच्या गुरेघर येथील टोलनाक्यावर थांबविले जाऊ लागले. त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवले.
यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, सहायक उप वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी, विशाल तोष्णिवाल, प्रशांत आखाडे, विजय भिलारे, शांताराम धनावडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पाच दिवसांसाठी वसुली बंद
नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल व मुख्याधिकारी सचिन पवार यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृह गाठले. नगराध्यक्षा तोष्णिवाल यांनी गुरेघर येथील टोल वसुलीला आक्षेप घेत वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली. यावरून वन अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यात वाद सुरू झाले. वसुली बंद न केल्यास महाबळेश्वर बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेवटी वन विभागाने नरमाईचे धोरण घेत ही वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा घेतला. मात्र, या पाच दिवसांत पालिकेने निर्णय न घेतल्यास पुन्हा वसुली करण्याचा इशारा या बैठकीत दिला.


आज होणार
पुन्हा बैठक
दरम्यान, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. ६ रोजी हिरडा विश्रामगृहावर पालिका व वनविभागाची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: In the forest-park, weighed in toll!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.