वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:20+5:302021-01-08T06:04:20+5:30

कऱ्हाड तालुक्यातील कोळे बिट हे नऊशे हेक्टर वनक्षेत्र असलेले सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते; तर सामाजिक वनिकरणाचे सुमारे ...

Forest department's vigilance to prevent floods | वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा जागर

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा जागर

कऱ्हाड तालुक्यातील कोळे बिट हे नऊशे हेक्टर वनक्षेत्र असलेले सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते; तर सामाजिक वनिकरणाचे सुमारे तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात घनदाट झाडी व डोंगरक्षेत्र मोठे असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही मोठी आहे. ससा, बिबट्या, रानडुक्कर, काळवीट आदी प्राण्यांसह सरपटणाऱ्या विविध जातीच्या प्राण्यांची या विभागात मोठी संख्या आहे. डोंगर पायथ्याला बारमाही पाणीसाठा असलेला वानरवाडी पाझर तलाव असल्याने पशु-पक्ष्यांची मोठी संख्या आहे.

सध्या सर्वत्र गवत कापणी सुरू झाली आहे. वनक्षेत्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या गायरान तसेच चालू जमिनी आहेत. शेताकडील बांधावरचे, तर गायरानातील गवत कापणी केल्यानंतर साचलेला पालापाचोळा शेतकऱ्यांकडून पेटवला जातो. त्यावेळी अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्याने वनक्षेत्राला वणवा लागून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे वणवा लागू नये, यासाठी नोटीसद्वारे जनजागृती केली जात आहे.

- चौकट

... तर दंडासह तुरुंगवासाची शिक्षा

जंगलक्षेत्र व रोपवन परिसर हद्दीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी बांध पेटवताना वन विभागाला त्याबाबतची माहिती द्यावी. माहिती न दिल्यास अथवा सावधगिरीच्या उपाययोजना न करता बांध पेटविल्यास भारतीय वनअधिनियम कायद्यानुसार एक वर्ष कैद व दोन हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा संबंधिताला भोगाव्या लागतील, असा इशाराही नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

- चौकट

वन विभागाने केले आवाहन

१) बांध पेटवताना आग विझल्याशिवाय मालकी क्षेत्र सोडून जाऊ नये.

२) जंगलक्षेत्रास वणवा लागल्यास वन कर्मचाऱ्यांना मदत करा.

३) वणवा लावणाऱ्याचे नाव कळवावे.

४) आगीपासून जंगलसंपत्तीचे संरक्षण करावे

Web Title: Forest department's vigilance to prevent floods