वनविभागाने घाईगडबडीत येरळवाडीचे बारसं घातलं ‘येराळवाडी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:58+5:302021-08-18T04:45:58+5:30
वडूज : येरळवाडी मध्यम प्रकल्प हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील खटाव तालुक्यामध्ये येरळा नदीवर आहे. या क्षेत्राची मालकी कृष्णा ...

वनविभागाने घाईगडबडीत येरळवाडीचे बारसं घातलं ‘येराळवाडी’!
वडूज : येरळवाडी मध्यम प्रकल्प हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील खटाव तालुक्यामध्ये येरळा नदीवर आहे. या क्षेत्राची मालकी कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे आहे. मात्र, मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणारे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना १५ मार्च रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली. येरळवाडीसह अन्य गावांना विचारात न घेतल्याने आंदोलने झाली; परंतु राजपत्रित आदेशानुसार हे क्षेत्र वनविभागाने काही अटींवर ताब्यात ठेवले. वनविभागाच्या घाईगडबडीने ‘येराळवाडी- मायणी’ पक्षी संवर्धन राखीव वनविभाग, सातारा’ या प्रसिद्धपत्रकांमुळे खटाव तालुक्यात वनविभागाविरोधात पुन्हा एकदा राळ उठली आहे.
मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्राच्या अधिसूचनेतून येरळवाडी मध्यम प्रकल्प वगळण्यात यावा, यासाठी १५ जूनपासून बेमुदत उपोषण येरळवाडी जलाशय पाणी उपसा संस्था व पाणी उपसा शेतकऱ्यांनी सुरू केले. प्रशासनाच्या मध्यस्थीने हे उपोषण स्थगित केले. हा प्रकल्प अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असून मुख्य धरण हे मातीचे आहे. धरणातील पाणीसाठ्याचा वापर हा कालवा व उपसा सिंचनासाठी आणि परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी होत आहे. खटाव तालुक्यातील या धरणाचे ठिकाण अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असल्याने सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याची मागणी कायमस्वरूपी येत आहे. मूळ प्रकल्प मंजुरी नियोजनानुसार ही फक्त सिंचनासाठी असून पिण्यासाठी व औद्योगिक प्रयोजनार्थ कोणतीही तरतूद नाही. कालांतराने आवश्यकतेनुसार येरळवाडी प्रकल्पातून वडूज, मायणी, अंबवडे, कातरखटाव या शहर व आसपासच्या गावांना काही प्रमाणात मंजुरी देण्यात आली. टंचाई कालावधीत तालुक्यातील खेड्यांना टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठाही करण्यात येतो. या जलाशयातून मासेमारी व्यवसायाचा ठेकाही देण्यात आला आहे.
दुष्काळ घोषित झाल्यानंतर जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिके घेण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत विनामूल्य बियाणे जलाशयातील उपलब्ध जमीन गाळपेरासाठी उपलब्ध करून देण्यात येते. सर्व बाबी असतानाही वनविभागाने हे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून ताब्यात घेतले. आंदोलनकर्ते, प्रशासन यांच्यातील मुंबई येथील बैठक पार पडली. काही जाचक अटी शिथिल करून मध्य मार्ग निघाला, पण ते तोंडी स्वरूपातीलच ठरले.
वनविभागाने मोठे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात येरळवाडीचे नाव येराळवाडी करून तालुक्यात राळ तर उठवलीच आहे. मात्र, पत्रकातील लागू कलम प्रसिद्ध करून तेथील लोकांना भयभीत केले आहे. वास्तविक मुंबई येथील बैठकीत सद्य:स्थितीतील वास्तव पाहणी करून व तेथील ग्रामस्थांशी चर्चा विनिमय करूनच संबंधित विभागाकडे अहवाल सादर केल्यानंतर पुढील मार्ग सुकर करण्यासाठी हालचाली होणार असल्याचे संकेत असताना वनविभागाच्या या पत्रक गडबडीने नेमके काय साध्य केले हे येणारा काळच निश्चित करेल.
फोटो :
येरळवाडीसंदर्भात वनविभागाने अशा पद्धतीने चुकीचे पत्रक काढून संभ्रमावस्था निर्माण केली आहे. (छाया : शेखर जाधव )