चॅरिटीसाठी परदेशी पाहुण्यांचा पणजी-मुंबई प्रवास !
By Admin | Updated: June 19, 2015 00:19 IST2015-06-18T22:12:28+5:302015-06-19T00:19:04+5:30
नॉर्वेतून भारत भ्रमण : सातारकरांच्या सहकार्याने प्रफुल्लीत झाले पाहुणे

चॅरिटीसाठी परदेशी पाहुण्यांचा पणजी-मुंबई प्रवास !
साई सावंत - कोंडवे -तेल निर्मितीत अग्रेसर असलेला देश म्हणून ओळख असलेल्या नॉर्वे येथील सहा नोकरदार तरूण भारत भ्रमणासाठी आले आहेत. दहा दिवसांच्या त्यांच्या या भारत भेटीत ते पणजी ते मुंबई असा प्रवास रिक्षातून करणार आहेत. या प्रवासासाठी मिळणारे मानधन ते येथील एका शाळेस देणार आहेत. सातारकरांच्या आदरातिथ्याने हे पाहूणे चांगलेच भारावले आहेत. नॉर्वे येथील ओयस्टन, जॉर्जन, इंग्वार, रॉबर्ट, मार्कस आणि थॉमस या सहा नोकरदारांनी लोकसेवेचा संकल्प करून भारत देशाची निवड केली. त्यांच्याबरोबर सहा जणांच्या चार टीम आल्या आहेत. भारताच्या चार कोपऱ्यांमध्ये जावून भटकंती करून मिळणाऱ्या मानधनातून ते शाळांना देणगी स्वरूपात मदत करणार आहेत.
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या या परदेशी पाहुण्यांनी सातारा शहरास भेट दिली. दोन रिक्षांतून सहा जणांचा हा प्रवास पणजीपासून सुरू झाला. साताऱ्यात असणारे ढगाळ वातावरण त्यांना आवडले. या वातावरणामुळे त्यांना उन्हाचा तडाखा जाणवला नाही.
भाषेवर देहबोलीने मात!
पणजी ते मुंबई हा प्रवास करताना या नॉर्वे निवासी परदेशी पाहुण्यांना भन्नाट अनुभव आले. त्यांच्यातील केवळ दोघांनाच इंग्रजी बोलता येते. या प्रवासात संवाद साधताना, जेवताना काही अन्न पदार्थ मागविताना त्यांना भाषेचा त्रास होवू लागला. त्यावर शक्कल लढवत त्यांनी देहबोलीवरून आपल्या आवश्यक असणाऱ्या गोष्टींविषयी मागणी केली. तीन दिवसांच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी दोन ठिकाणी मुक्काम केला आहे. हा प्रवास करताना त्यांनी मोबाईलवर ‘नॅव्हीगेशन’चा उपयोग करून मार्ग शोधला. जेवण, पेट्रोल, नाष्टा आणि अन्य गोष्टींसाठी मात्र त्यांना देहबोलीचा उपयोग करावा लागला.
सातारकरांची फोटो क्रेझ!
पहिल्यांदाच भारतात आलेल्या या परदेशी पाहूण्यांना भारतीयांचे फोटो प्रेम फारच आवडले. ‘आम्ही कुठेही गेलो आणि कोणालाही मदत मागितली की ते पहिल्यांदा फोटो काढू का? असे विचारतात.
प्रत्येकजण आमच्याबरोबर फोटो काढण्यास उत्सुक असतो. भारतीयांच्या आदरातिथ्याविषयी आम्ही ऐकलं होता, त्याचा चांगला अनुभव आम्ही साताऱ्यातही घेत आहोत’, असे या पाहुण्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगिंतले.
भारतीय लोक प्रेमळ आहेत. साताऱ्याविषयी बोलायचे झाले तर इथे प्रत्येकजण विनामोबदला मदत करायला तयार आहेत. शहरात उत्तम जेवणाची सोय कुठे आहे, असे विचारल्यावर एका व्यक्तिने आम्हाला चक्क त्या हॉटेलच्या दारात नेवून सोडले. इतकी आत्मीयता आणि निर्व्याज प्रेम अन्य शहरांमध्ये अभवानेच पहायला मिळते.
- ओयस्टन, नॉर्वे