जबरदस्तीने कारमध्ये बसून अभियंत्याला घरी जाण्यास रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:56+5:302021-09-13T04:38:56+5:30
सातारा : तोडलेले वीज कनेक्शन जोडून देण्यासाठी सहायक अभियंत्याच्या कारमध्ये बसून त्यांना घरी जाण्यास प्रतिबंध केल्याचा प्रकार फलटणमध्ये घडला. ...

जबरदस्तीने कारमध्ये बसून अभियंत्याला घरी जाण्यास रोखले
सातारा : तोडलेले वीज कनेक्शन जोडून देण्यासाठी सहायक अभियंत्याच्या कारमध्ये बसून त्यांना घरी जाण्यास प्रतिबंध केल्याचा प्रकार फलटणमध्ये घडला. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात हाॅटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ११ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
नंदकुमार हरिभाऊ कचरे (रा.धुळदेव, ता.फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटणमधील वीज वितरण कार्यालयात नेहमीप्रमाणे सहायक अभियंता अनिरुद्ध लिंमकर (वय ३५) हे काम करत असताना नंदकुमार कचरे हे कार्यालयात आले. माझ्या हाॅटेलचे वीज कनेक्शन जोडून द्या. यावर तुम्ही बिल भरा तुमचे कनेक्शन जोडून देतो, असे अभियंता लिंमकर यांनी सांगितले, परंतु कचरे यांनी पहिले वीज कनेक्शन जोडून द्या, तरच मी बील भरतो, अशी भूमिका घेतली. काही वेळानंतर ऑफिस बंद करून लिंमकर घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसून लिंमकर यांना घरी जाण्यास प्रतिबंध केला. यामुळे फलटणमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर सहायक अभियंता लिंमकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी हाॅटेल व्यावसायिक नंदकुमार कचरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास हवालदार विरकर हे करीत आहेत.