ठोसेघरकडे वळू लागली पर्यटकांची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:18+5:302021-09-02T05:24:18+5:30
परळी : कोरोना आला अन् सर्वात मोठा फटका बसला पर्यटन क्षेत्राला बसला. जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे गेल्या दीड वर्षापासून ...

ठोसेघरकडे वळू लागली पर्यटकांची पावले
परळी : कोरोना आला अन् सर्वात मोठा फटका बसला पर्यटन क्षेत्राला बसला. जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे गेल्या दीड वर्षापासून पर्यटकांचा नजरे पलीकडेच होती. काही दिवसांपासून साताऱ्यातील कोरोनाचा आलेख कमी होत असल्याने बहुतांश निर्बंध हे शिथिल केले आहेत. त्यामुळे ठोसेघर परिसरात पुन्हा पर्यटकांची पावले वळायला लागली आहेत.
सातारा बोगदा मार्गे ठोसेघरकडे निघाले की प्रथम दर्शन होते ते किल्ले सज्जनगड. त्यानंतर घाट रस्ते तसेच डोंगरांनी हिरवा शालू नेसलेला असल्याने निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. त्याचबरोबर असलेली भातशेती आणि त्यातूनच वाट काढत चाललेला आपला ठोसेघरचा प्रवास मन अगदी तृप्त होऊन जाते. ठोसेघरमध्ये फेसाळत कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागायला लागल्या आहेत. दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत निसर्गाचा आनंद घेत आहेत. अधूनमधून सुरू असलेल्या ऊन- पावसाचा खेळ पर्यटकांना मोहित करत आहे.
ठोसेघर परिसरात दीड वर्षांपासून पावसाळ्यातही शांतता पाहायला मिळत होती. साताऱ्यातील कोरोनाची दाहकताच एवढी होती. त्यामुळे तेथील पर्यटन क्षेत्रावरील आधारित असलेले व्यवसाय हे ठप्प होती. मिळणारे थोडेफार उत्पादन हे बंद झाले होते. हा आकडा जसजसा कमी होत चालल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. आणि पुन्हा एकदा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र जोर धरू लागला आहे. त्याचबरोबर त्यावरील आधारित असलेली व्यवसायदेखील सुरू झाले आहेत. त्यामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे.