एसटीच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार
By Admin | Updated: November 22, 2015 00:01 IST2015-11-21T23:29:53+5:302015-11-22T00:01:54+5:30
अतीतजवळील घटना : विरुद्ध दिशेने आल्याने अपघात

एसटीच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अतीत, ता. सातारा येथे एसटीने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजता झाला.
शंकर अण्णासो निकम (वय ४८), द्रोपदा शंकर निकम (४३, रा. सासपडे, ता. सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिराळा डेपोची एसटी (एमएच १४ बीटी ३८५७) मुंबईहून शिराळ्याकडे निघाली होती. दुपारी दोन वाजता ही एसटी अतीत येथील शाहू पॉलिटेक्निकजवळ आली. याचवेळी विरुद्ध दिशेने निकम दाम्पत्य दुचाकीवरून येत होते. एसटीने या दाम्पत्याला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांच्या दुचाकीचे हॅण्डलपासून दोन भाग झाले. काही फूट उंच उडून दोघेही महामार्गावर जोरदार फेकले गेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात एसटीच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. एसटी चालक अब्दुल निजाम
दिवाण (रा. देऊर, ता. शिराळा)यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
‘ते’ करत होते आल्याचे व्यापार
शंकर निकम हे आल्याचे व्यापार करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सासपडेमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची एक मुलगी प्राजक्ता ही बारावी सायन्समध्ये तर मुलगा हृषीकेश नववीच्या वर्गात शिकत आहे. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे या दोन्ही मुलांवर पोरकं होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.