निसर्गाच्या सानिध्यात प्रेमीयुगुलांचा चाळा
By Admin | Updated: September 29, 2014 00:48 IST2014-09-29T00:48:25+5:302014-09-29T00:48:25+5:30
कोयनानगर : धूमस्टाईलमुळे नागरिक त्रस्त

निसर्गाच्या सानिध्यात प्रेमीयुगुलांचा चाळा
कोयनानगर : कोयना परिसरातील विविध पर्यटनस्थळांवर प्रेमीयुगुलांचा वावर वाढला असून, स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. येथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या करामतीमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ हरवून जात आहे.
नाकातोंडाला रुमाल बांधून धूमस्टाईलने ओझर्डे धबधबा, रामबाण, नेहरू उद्यान, घाटमाथा, रामघळ आदी ठिकाणांकडे सुसाट धावणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या दुचाकी हे आता नित्याचेच झाले आहे. रविवारी तर ही ठिकाणे गजबजलेली असतात. हे प्रेमीयुगूल रस्त्यालगत किंवा थोड्या आत आडोशाला बसलेले असतात.
त्यांना जगाचा विसर पडलेला असतो. त्यामुळे येथून जाणाऱ्या स्थानिकांच्या गाड्या तसेच विद्यार्थी, महिलांना मान खाली घालून जावे लागते. एकांतासाठी कॉलेज युवक-युवती कोयना परिसरात हजेरी लावतात. सुटीच्या दिवशी तसेच कॉलेजच्या दिवशी कॉलेज बुडवून शिक्षणाच्या नावाखाली वेगळेच काही सुरू असते. यासाठी कोणी कुठून लिफ्ट द्यायची हेही आधीच ठरलेले असते.
त्यांच्या या प्रकाराचा इतरांना त्रास होत आहे. याचा जराही विचार त्यांच्या मनात येत नाही. या प्रेमीयुगुलांबरोबरच झाडा-झुडपांचा आडोसा बघून काहीची ओली पार्टी सुरू असते. यावेळी रिकाम्या बाटल्या खाद्य पदार्थ्यांचे कागद तेथेच टाकून निघून जातात. त्यामुळे पर्यावरणासही धोका पोहोचत आहे. (वार्ताहर)