शिरवळमध्ये धुमश्चक्री; १५ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST2021-09-13T04:39:12+5:302021-09-13T04:39:12+5:30
शिरवळ : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. या प्रकरणी परस्परांविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील १५ ...

शिरवळमध्ये धुमश्चक्री; १५ जणांवर गुन्हा दाखल
शिरवळ : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. या प्रकरणी परस्परांविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील १५ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांतील पाचजणांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील धीरज भाऊसाहेब माने (वय २७) हा आपल्या मित्रांसोबत पंढरपूर फाटा या ठिकाणी चहा पीत असताना शनिवारी (दि. ११) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तिथे अनिल ऊर्फ पाप्या वाडेकर, स्वप्निल वाडेकर, माउली राऊत, रोहित (सर्व रा. शिरवळ), विकास पिसाळ (रा. धनगरवाडी, ता. खंडाळा), गुंजा (रा. खंडाळा), हृतिक बोलाले, साहिल चव्हाण, संकेत मोरे (सर्व रा. कऱ्हाड) व इतर तीन अनोळखी युवक त्या ठिकाणी आले. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अनिल ऊर्फ पाप्या वाडेकर याने लाथ मारून खुर्चीवरून तेजस रसाळ याला खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी धीरज माने हा भांडणे सोडविण्याकरिता आला असता त्यालाही मारहाण झाली. या प्रकरणी धीरज माने याने दिलेल्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुंजा ऊर्फ गुंजन भरत भोसले (२०), शुभम किसान गंगावणे (२१, दोघे रा. बावडा, ता. खंडाळा), विकास आप्पाजी ढमाळ (२९, रा. अंबारवाडी, ता. खंडाळा) यांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विकास सतीश पिसाळ (रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) याने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश गुलाबराव राऊत (२७, रा. शिरवळ, ता. खंडाळा), तेजस विठ्ठल प्रसाद रसाळ (२६, रा. सध्या शिरवळ, मूळ रा. विटा, सांगली) या दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांतील १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत पाचजणांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनांची नोंद शिरवळ पोलीस ठाण्याला झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, पोलीस अंमलदार धीरजकुमार यादव हे करीत आहेत.