पक्ष्यांसाठी झाडांवरच केली चारा-पाण्याची व्यवस्था
By Admin | Updated: April 16, 2015 00:04 IST2015-04-15T23:04:24+5:302015-04-16T00:04:53+5:30
सर्पमित्र सरसावले : काशीळ येथे झाडांना टांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या

पक्ष्यांसाठी झाडांवरच केली चारा-पाण्याची व्यवस्था
काशीळ : उन्हाच्या झळा जशा माणसाला बसतात तशाच पशु-पक्ष्यांनाही बसत असतात. माणसानेच जंगलतोड अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यामुळे पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. चारा-पाण्याला महाग झालेले पशु-पक्षी म्हणून तर मानवी वस्तीत पोटासाठी येताना दिसतात. त्यांच्यासाठी काही करण्याची आता वेळ आली असून खारीचा वाटा म्हणून तीव्र उन्हाळा पक्ष्यांसाठी सुसह्य व्हावा, यासाठी त्यांना चारा-पाणी देण्याची एक वेगळी सोय काशीळ येथील सर्पमित्रांनी एकत्र येऊन केली आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे परिसरातील पक्ष्यांना भटकंती करावी लागू नये म्हणून काशीळ येथील सर्पमित्र सोहेल शेख आणि योगेश पवार, विशाल खावडीया, प्रफ्फुल माने, आशपाक फकीर या त्यांच्या सहकार्यांनी प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या गोळ करून त्या झाडाला टांगल्या आहेत. त्यामध्ये पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे पक्ष्यांची चांगली सोय झाली आहे. पक्ष्यांच्या प्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत या मित्रांनी इतर तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)
सध्या सगळीकडे पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांबरोबरच पशु-पक्ष्यांनाही भटकंती करावी लागत आहे. तरूणांनी आपल्या परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय करायला पाहिजे.
- सोहेल शेख, सर्पमित्र