आटपाडीत वसतिगृहांची झाडाझडती
By Admin | Updated: December 4, 2014 00:49 IST2014-12-04T00:47:57+5:302014-12-04T00:49:13+5:30
निरीक्षकांकडून चौकशी : समाजकल्याण विभागाला आली जाग; अहवालही सादर

आटपाडीत वसतिगृहांची झाडाझडती
आटपाडी : आटपाडीतील शासकीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची वसतिगृहे म्हणजे छळछावण्या बनल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्तानंतर समाजकल्याण विभागाला जाग आली आहे. समाजकल्याण निरीक्षक एस. के. सुपनीकर यांनी दोन्हीही वसतिगृहांना भेट देऊन चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल या विभागाचे सहआयुक्त दीपक घाटे यांना दिला आहे. यावर कधी आणि कोणती कारवाई केली जाणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागाने साडेसात कोटी खर्चून मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहे बांधली आहेत. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता ८४ असून, प्रत्यक्षात तिथे ६४, तर मुलींच्या वसतिगृहाची क्षमता ६४ एवढी असून, सध्या तिथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५० युवती रहात आहेत.
सध्या मुलींच्या वसतिगृहाला महिला अधीक्षक नाही. हे पद रिक्त आहे. काही वर्षांपूर्वी विनयभंगासारख्या गंभीर घटनेमुळे एका महिला अधीक्षिकेच्या येथील वसतिगृहातील पतीवर गुन्हा दाखल झाला होता. त्या महिला अधीक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तर त्यानंतर एका पांडुरंगाच्या नगरीच्या चेल्याने मुलींशी गैरवर्तन केल्याने त्या अधीक्षकाला मुलींच्या नातेवाईकांनी चोप दिला होता. याकडे समाज कल्याण विभाग दुर्लक्ष करीत आहे. सध्या मुलींच्या वसतिगृहाचा पदभार एस. एस. थोरात हे पाहात आहेत. या वसतिगृहातील सर्व प्रश्नांना ‘लोकमत’ने दि. २९ नोव्हेंबरच्या अंकात वाचा फोडली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १ डिसेंबर) निरीक्षक सुपनीकर आटपाडीत आले. त्यांनी मुला-मुलींच्या अडचणींबाबत दोन्हीही वसतिगृहात जाऊन विचारणा केली. त्यावेळी मुला-मुलींनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. (वार्ताहर)