फ्लेक्सवर झळकताय? जरा जपून!
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T23:21:35+5:302016-03-01T00:10:29+5:30
फलकांवर दिसताच गायले जायचे गोडवे; आता दिसताक्षणी पोलिसांना कळविणे

फ्लेक्सवर झळकताय? जरा जपून!
सातारा : पोलिसांना डोकेदुखी ठरलेले अनेक ‘बाबूराव’ आता हद्दपार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यांच्या वाढदिवसाचे फलक शहरभर थाटात उभे राहत होते, तेच पोलिसांचा झटका बसल्याने हद्दीबाहेर काढण्यात आले आहेत.शहर परिसरात ज्यांचे फलक थाटात उभे राहत होते. पालिकेची कधी परवानगी तर कधी दंडेलशाही पद्धतीने हे फलक झळकवले जात. नेत्यांचा वाढदिवस असो, कुठली नवी नियुक्ती असो. तडीपारांपैकी अनेक बहाद्दर बुके हातात घेऊन शहरातील फलकांवर हजर! नेत्यांचा वरदहस्त असल्याचे भासवून पोलिसांपुढे मिजास मारणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच पेकाटात मारलेली पाहायला मिळत आहे. शांत साताऱ्यात आतून धगधगणारी अस्वस्थता या तडीपारीच्या निर्णयाने बाहेर पडली आहे. पोलिसांनी १५ जणांना तडीपार केलेआहे. यापैकी काहीजण सातारा, कोरेगाव, जावळी तालुक्यांतून, काहीजण सातारा जिल्ह्यातून तर काहीजण पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून तडीपार केले गेले आहेत.
पोलीस एवढ्यावरच थांबलेले नाहीत. शहरामध्ये नगरपालिका, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, शिवाजी संग्रहालय या परिसरात या तडीपार मंडळींचे फोटोसह तडीपारीच्या तारखेची माहिती देणारे फलक झळकले आहेत. यापैकी कोणीही हद्दपार केलेल्या ठिकाणावर आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. शहरभर अनेकजण नेत्यांच्या वाढदिवसांचे, नवीन नियुक्तीचे औचित्य साधून फलक उभारत होते. त्यावर तडीपारांपैकी अनेकांचे फोटो झळकत. तेव्हा लोक मुजरे करत होते. (प्रतिनिधी)
लपून-छपून...
तडीपारीची नोटीस निघाल्याने तडीपार केलेल्या तारखेपर्यंत या मंडळींना हद्दीबाहेर राहावे लागणार आहे. तरीही लपून-छपून त्यांचा ‘उद्योग’ सुरू राहू शकतो, हे ओळखून पोलिसांनी त्यांचे फोटो फलकांवर झळवले आहेत.