वाईतील पाच विद्यार्थ्यांना अटक

By Admin | Updated: December 2, 2014 23:29 IST2014-12-02T22:08:51+5:302014-12-02T23:29:52+5:30

विद्यार्थी मारहाण : आणखी काहींवर होणार कारवाई

Five students arrested | वाईतील पाच विद्यार्थ्यांना अटक

वाईतील पाच विद्यार्थ्यांना अटक

वाई : येथील किसन वीर महाविद्यालयात झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी याच महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दरम्यान आणखी काही विद्यार्थ्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे वाई पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
श्रीकांत सुभाष सोणावणे (वय २८), वैभव दिलीप गुळंूबकर (वय १९, रा़ सोनगिरवाडी, वाई), दत्तात्रय बबन गोरे (वय २७, नावेचीवाडी, गंगापूरी, वाई), ओंकार विक्रांत शिंदे (वय २0, गणपती आळी, वाई), आदित्य प्रमोद जठार (वय १९, धोम कॉलनी, वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाई येथील किसन वीर महाविद्यालयात सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता येथील विद्यार्थ्यांच्या साठ ते सत्तर जणांच्या एका ग्रुपने महाबळेश्वरच्या काही विदयार्थ्यांना बेदम मारहाण केली होती.
किसन वीर महाविद्यालयातील मारहाण प्रकरणाची दखल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी संस्थेचे सचिव अनिल जोशी, सहसचिव प्रा़ नारायण चौधरी, प्राचार्य डॉ़ सी. जी़ येवले, उपप्राचार्य प्रा. जालिंदर डुंबरे-पाटील, पर्यवेक्षक प्रा़ देवानंद शिंगटे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे आणि सर्व संचालकांची बैठक बोलाविली. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, भोसले यांनी पोलीस निरीक्षक गलांडे यांच्याकडून माहिती घेतली.
दरम्यान, जनता शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनतंर प्राचार्य डॉ़ येवले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाविद्यालयाने आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाविद्यालय परिसर खूप मोठा आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तक्रार देणे आवश्यक होते. त्यांनी तसे न करता परस्पर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरीदेखील आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. दोषी विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. दरम्यान, तातडीच्या उपाययोजना म्हणून दोन नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसांठी सक्तीचे हजेरीपत्रक, शिस्तपालन समितीचे गठण आदीवर लक्ष देणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करत आहेत. (प्रतिनिधी)

सीसीटीव्ही बंद
किसन वीर महाविद्यालयामध्ये नवीन इमारतींचे बांधकाम चालू असल्याने महाविद्यालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. परिणामी मारहाण कोणी केली, उपस्थित कोण होते याची माहिती पोलिसांना मिळू शकत नसल्याचे समोर आले आहे.


किसन वीर महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात सहभागी दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाविद्यालयाची शिस्त बिघडवून नाहक बदनामी करणा-या विदयार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रतापराव भोसले
अध्यक्ष, जनता शिक्षण संस्था

Web Title: Five students arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.