‘आॅनलाईन’द्वारे पाच लाखांचा गंडा
By Admin | Updated: August 30, 2015 00:23 IST2015-08-30T00:18:53+5:302015-08-30T00:23:06+5:30
सांगलीतील घटना : लखनौच्या अविनाशकुमारच्या खात्यावर रक्कम जमा

‘आॅनलाईन’द्वारे पाच लाखांचा गंडा
सांगली : येथील रेल्वे स्टेशनजवळील मयूर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या वैशाली भैरव पाटील यांना आॅनलाईन बॅँकिगद्वारे पाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पाटील यांचे खाते असून, तेथून ही रक्कम आॅनलाईन काढण्यात आली. १९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला आहे. ही रक्कम उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरातील अविनाशकुमार याच्या स्टेट बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वैशाली पाटील या सिंगापूर येथील एका कंपनीत नोकरीस आहेत. त्या तिथेच राहतात; पण त्यांचे आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत खाते आहेत. त्यांचे बँकेचे सर्व व्यवहार त्यांच्या बहिणीचे पती दिलीपसिंह आनंदराव पवार (रा. मयूर हौसिंग सोसायटी, सांगली) हे पाहतात. १९ डिसेंबर २०१४ रोजी वैशाली यांच्या खात्यामधून ४ लाख ९८ हजारांची रक्कम काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. वैशाली यांनी हा प्रकार पाहन भाऊजी दिलीपसिंह पवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी मी बँकेतून एक पैसाही काढला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी स्वत: बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी आॅनलाईनद्वारे ही रक्कम काढल्याची माहिती मिळाली. एका दिवसात एवढी रक्कम दुसऱ्याच व्यक्तीने काढल्याचे समजताच पाटील यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली.
गेल्या आठ महिन्यांपासून बँक प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु होती. चौकशीत वैशाली पाटील यांच्या बँक खात्यावरून काढलेली ही रक्कम उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरातील अविनाशकुमार नामक व्यक्तीच्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. आॅनलाईनद्वारे ही रक्कम अविनाशकुमारने हस्तांतर करून घेऊन गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये बँक प्रशासनाने आमची कोणतीही चूक नसल्याचे सांगितले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर वैशाली पाटील यांच्यातर्फे दिलीपसिंह पवार यांनी शनिवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल चोरमले तपास करीत आहेत.
निरीक्षक चोरमले यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, गुन्हा आज दाखल केला आहे. आयसीआयसीआय बँकेमधून तपासाला सुरुवात केली जाईल. आठ महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे. संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी बारकाईने तपास केला जाईल. तपासाची व्याप्ती उत्तर प्रदेश राज्यापर्यंत जाणार आहे. संशयित अविनाशकुमार नामक व्यक्ती कोण, हे पाहिले जाईल.
यासाठी लखनौच्या स्टेट बँकेत संपर्क साधला जाईल. कदाचित ही व्यक्ती बोगस असू शकते. तपासात या सर्व बाबी उजेडात आणल्या जातील. (प्रतिनिधी)