मारहाण करून पाच लाख लुटले

By Admin | Updated: June 13, 2014 02:02 IST2014-06-13T01:23:24+5:302014-06-13T02:02:10+5:30

इंदोली फाट्यावरील थरार : बिल्डरसह कार चालकालाही बेदम मारहाण

Five lakh robbed by the assault | मारहाण करून पाच लाख लुटले

मारहाण करून पाच लाख लुटले

उंब्रज : पुण्याहून मालवणकडे निघालेल्या बिल्डरला इंदोली फाटा येथे लुबाडण्यात आले. सहा दरोडेखोरांनी बिल्डरला मारहाण करीत त्याच्याकडील पाच लाखांचा ऐवज लंपास केला. काल, बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत बिल्डर श्रीनिवास मनोहर अंधारी (वय ४८, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण येथील बिल्डर श्रीनिवास अंधारी हे काही कामानिमित्त आपल्या कारमधून पुण्याला गेले होते. त्यांच्यासोबत कारचालक नीलेश सखाराम पारधी (वय ३०, रा. मालवण) हा होता. काल रात्री श्रीनिवास हे परत मालवणला जाण्यासाठी पुण्याहून निघाले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे आले. त्यावेळी चालक नीलेश याने लघुशंकेसाठी कार महामार्गाकडेला थांबवली. बिल्डर श्रीनिवास व चालक नीलेश दोघेजण काही अंतरावर गेले असताना अचानक सहाजणांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात जखमी झालेले श्रीनिवास व नीलेश हे दोघेजण कारमध्ये काहीवेळ बसून राहिले.
श्रीनिवास हे गंभीर जखमी असल्याने नीलेश त्यांना घेऊन तातडीने कोल्हापूरला गेला. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात श्रीनिवास यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर नीलेशवर प्राथमिक उपचार करून त्याला सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उंब्रज पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन श्रीनिवास यांची भेट घेतली. तसेच आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली. याबाबतचा गुन्हा उंब्रज पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Five lakh robbed by the assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.