दोनशे रुपयांसाठी अॅसिड हल्ला पाच जखमी : कसबे डिग्रजमधील घटना; जेवणाचे बिल देण्यावरून कृत्य
By Admin | Updated: May 10, 2014 23:44 IST2014-05-10T23:44:27+5:302014-05-10T23:44:27+5:30
सांगली : जेवणाचे दोनशे रुपये बिल देण्याच्या वादातून कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे तरुणाने अॅसिड हल्ला केला. यामध्ये हॉटेलमालकासह

दोनशे रुपयांसाठी अॅसिड हल्ला पाच जखमी : कसबे डिग्रजमधील घटना; जेवणाचे बिल देण्यावरून कृत्य
सांगली : जेवणाचे दोनशे रुपये बिल देण्याच्या वादातून कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे तरुणाने अॅसिड हल्ला केला. यामध्ये हॉटेलमालकासह स्वत: संशयित तरुण भाजून गंभीर जखमी झाला. आज (शनिवारी) दुपारी चारला ही घटना घडली. जखमींमध्ये अरुण बाळासाहेब हजारे (वय ३५) या संशयितासह बाजीराव मुरलीधर परीट (४८), त्यांची मुले संदीप (२७), प्रदीप (२३) व आई अंबुताई (७०, सर्व रा. कसबे डिग्रज) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबुताई वगळता सर्वजण ४५ ते ५० टक्के भाजले आहेत. अंबुताई यांच्या पायावर अॅसिड पडले आहे. रात्री उशिरा जखमींचे जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. परीट यांचे कसबे डिग्रज गावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘गुरुप्रसाद’ हॉटेल आहे. हजारेचे गावात वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करून देण्याचे दुकान आहे. ते एकाच गल्लीत राहतात. तो दुपारी दोनला परीट यांच्या हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. जेवणाचे बिल दोनशे रुपये झाले. त्याने एवढे बिल कसे झाले, अशी विचारणा करून बिल देण्यास नकार दिला. यामुळे परीट पिता-पुत्रांनी त्याच्याशी वाद घातला. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. तेथून हजारे निघून गेला. बिल वसूल करायचे, असा विचार करून परीट पिता-पुत्र त्याच्या घरी गेले. त्यावेळी तो दुकानात बसला होता. परीट यांनी बिल घेतल्याशिवाय जाणार नाही, असे त्यास सांगितले. तोही संतप्त झाला. त्याने थेट अॅसिडची बाटली घेऊन परीट पिता-पुत्रांच्या अंगावर फेकली. बाटलीचे झाकण काढून ती फेकण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्याही अंगावर अॅसिड पडले. त्यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी अंबुताई यांनी मध्यस्थी केली. त्यांच्याही पायावर अॅसिड पडले. यामध्ये पाचहीजण भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने खासगी रुग्णालयात हलविले. (प्रतिनिधी)