पालखी तळावर पाचशे स्वच्छतागृहे
By Admin | Updated: June 14, 2016 23:57 IST2016-06-14T23:52:41+5:302016-06-14T23:57:53+5:30
अश्विन मुदगल : फलटणला नियोजन बैठक; सोहळा यशस्वी पार पाडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

पालखी तळावर पाचशे स्वच्छतागृहे
फलटण : ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असून, त्याच्या स्वागताची आणि येथील वास्तव्या दरम्यान सेवेची संधी आपल्याला प्राप्त होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी, विश्वस्त व अन्य सर्वांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्वच शासकीय यंत्रणांनी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात रविवार, दि. ३ जुलै रोजी आगमन होत असून, सोहळ्याच्या स्वागतासाठी व येथील वास्तव्या दरम्यान परंपरागत पद्धतीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, प्रांताधिकारी वाई अस्मिता मोरे, तहसीलदार विजय पाटील, तहसीलदार खंडाळा शिवाजीराव तळपे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विभाग नियंत्रक श्रीमती ताम्हणकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे, नगर परिषद मुख्याधिकारी यशवंत डांगे, नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता सिद्मल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, उपविभागीय अभियंता पाटील, जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील उपस्थित होते.
यावर्षी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक पालखी तळावर ५०० फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध होत असून, संबंधित यंत्रणांनी या स्वच्छता गृहासाठी पुरेसे पाणी, प्रकाश व्यवस्था प्राधान्याने करावी त्याचबरोबर तेथील व्यवस्थेसाठी प्रत्येक २५ स्वच्छता गृहासाठी १ याप्रमाणे कर्मचारी नियुक्त करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. पालखी तळाची स्वच्छता सोहळा येण्यापूर्वी आणि सोहळा गेल्यानंतर दोन्ही वेळा संबंधित गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता करण्याला प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे पालखी तळाव्यतिरिक्त सोहळ्याचा मुक्काम असलेल्या गावात अन्य ठिकाणी काही दिंड्या व वारकरी थांबतात तेथील स्वच्छतेची काळजीही संबंधितांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या सोहळ्यात स्वच्छतेला विशेष महत्त्व देऊन कोणत्याही प्रकारे सोहळ्याच्या वास्तव्या दरम्यान आणि सोहळा पुढे गेल्यानंतर सोहळ्यातील वारकरी अथवा स्थानिकांना त्रास होणार नाही याची विशेष दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. या बैठकीपूर्वी आपण माउलींच्या नीरा स्रानाचे ठिकाण, सातारा जिल्ह्यातील स्वागताचे ठिकाण, लोणंद, तरडगाव, फलटण व बरड पालखी तळाची तसेच संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली असून, नीरा नदीतील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
सोहळ्यातील वारकरी भाविकांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका यांची नियुक्ती करण्याबरोबरच आवश्यक ती औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे साठे तपासावेत, त्याचे निर्जंतुकीकरण करावे ज्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नसेल तेथे स्पष्ट सूचना देणारे फलक लावावेत असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सोहळ्यातील योग्य व्यवस्थेसाठी प्रामुख्याने आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी, पोलिस, आरटीओ, पाणीपुरवठा या ६ विभागांमध्ये योग्य समन्वय अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने सर्वांनीच योग्य समन्वय ठेवून सोहळा यशस्वीरीत्या पार पडेल यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. (प्रतिनिधी)