कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात पाचजणांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:06+5:302021-05-23T04:39:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लोक टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवत ...

कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात पाचजणांच्या आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लोक टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संशयित असल्याच्या कारण तसेच कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा घरगुती नैराश्यात त्याचबरोबर अन्य कारणांमुळे जिल्ह्यात पाच जणांनी विविध ठिकाणी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेनवडी, राजापूर तसेच सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी, सोनगावतर्फे सातारा तर कराड येये एक अशा पाच आत्महत्यांची नोंद झाली असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातील शेनवडी येथील जाधव वस्तीमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय बाळासोा रामचंद्र जाधव यांनी घरगुती कारणातून आलेल्या नैराश्यातून दि. २० रोजी रात्री साडेदहा ते दि. २१ मे रोजी सकाळी सहा या वेळेत शेनवडी येथे राहत्या घराच्या समोर असणाऱ्या लाइटच्या खांबाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर श्रीमंत महादेव जाधव (वय ५२, रा. शेनवडी, रसाळ मळा, ता. खटाव) यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार एस. बी. काळेल करत आहेत.
सातारा तालुक्यातील कण्हेरनजीक असणाऱ्या माळ्याचीवाडी येथेही ३८ वर्षीय नंदकुमार वामन केसरकर यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. नंदकुमार केसरकर यांना खोकला आणि अशक्तपणा असल्यामुळे राहत्या घराच्या बाजूला असणाऱ्या एका खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांनी दि. २१ मे रोजी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर चंद्रकांत वामन केसरकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस नाईक हेमंत शिंदे करत आहे.
कराड येथील शनिवार पेठेत राहणाऱ्या परसू सैदाण्णा दरी (वय ३०, सध्या रा. दैत्यनिवारणी, शनिवार पेठ, कराड. मूळ रा. इजेरी, जबरगी, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) याने दि. २१ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाडाच्या फांदीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर अरुण श्रीनिवास शिंगण (वय ३७, रा. दैत्यनिवारणी, जुन्या पुलाशेजारी, शनिवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा तालुक्यातील सोनगाव येथील ज्योत्सना सुबोध कांबळे (वय ३५, रा. सोनगाव तर्फे सातारा, ता. सातारा) यांनी राहत्या घरी असणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, ज्योत्सना यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारास दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
आठ दिवसांपूर्वी विषारी औषधप्राशन केलेल्या खटाव तालुक्यातील राजापूर येथील गौरी आकाश मदने (वय १९) या विवाहितेचा दि. २० रोजी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या आत्महत्येची नोंद दि. २१ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. गौरी मदने यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दि. १५ मे रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषधप्राशन केले. या घटनेनंतर त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दि. २० मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याची खबर डॉ. स्नेहल चव्हाण, डॉ. दीपक जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, गौरी यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
कोरोनाच्या महामारीत अशाप्रकारे लोक आपले जीवन संपत असल्याचे दिसून येत आहे.