दुहेरी खूनप्रकरणात पाचजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:14+5:302021-03-19T04:39:14+5:30
दहिवडी : वाळूच्या कारणावरून नरवणे, ता. माण येथे बुधवारी झालेल्या धुमचक्रीत दोघांचा खून झाल्यानंतर गुरुवारी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले ...

दुहेरी खूनप्रकरणात पाचजणांना अटक
दहिवडी : वाळूच्या कारणावरून नरवणे, ता. माण येथे बुधवारी झालेल्या धुमचक्रीत दोघांचा खून झाल्यानंतर गुरुवारी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली.
कृष्णा धोंडिबा जाधव, सागर ऊर्फ संभाजी शिवाजी जाधव, शिवाजी धोंडिबा जाधव, सूर्यकांत नाथाजी जाधव, कृष्णा ऊर्फ दादा प्रकाश तुपे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, नरवणे येथे वाळूच्या तसेच जुन्या भांडणातून भावकीमध्ये दोन गटांत बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता जोरदार मारामारी झाली. त्यामध्ये विलास धोंडिबा जाधव व चंद्रकांत नाथाजी जाधव यांचा खून झाला होता. त्यानंतर परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल झाले होते, तर सहाजण जखमी झाले होते. नरवणे गावात अभूतपूर्व शांतता पसरली होती. त्यानंतर प्रकरणात मयत चंद्रकांत नाथाजी जाधव यांच्या बाजूने भावजय दया चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती.
त्यामधील कृष्णा धोंडिबा जाधव (वय ४८), सागर ऊर्फ संभाजी शिवाजी जाधव (२५), शिवाजी धोंडिबा जाधव (५२) यांना ताब्यात घेण्यात आले, तर दुसरे मयत विलास धोंडिबा जाधव यांच्या वतीने सत्यवान धोंडिबा जाधव यांनी फिर्याद दिली होती. यामधील आरोपी सूर्यकांत नाथाजी जाधव (४५), कृष्णा ऊर्फ दादा प्रकाश तुपे (३०) यांना ताब्यात घेतले.
दोन्ही परस्पर तक्रारीमध्ये एकूण १९ आरोपी आहेत. यामधील पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर काहीजण उपचार घेत आहेत. काहीजण फरार आहेत. या घटनेनंतर नरवणे गावात तणाव निर्माण झाला होता. गुरुवारी सर्व व्यवहार सुरळीत होते.