राष्ट्रवादीला प्रथमच दिवाळीचे लाडू गोड!
By Admin | Updated: October 21, 2014 23:39 IST2014-10-21T21:56:21+5:302014-10-21T23:39:59+5:30
खंडाळ्यात ‘गजर’ : विरोधकांनी केली चकली; झालं ‘कडबोळं’

राष्ट्रवादीला प्रथमच दिवाळीचे लाडू गोड!
मुराद पटेल - शिरवळ -वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील खंडाळा तालुक्याती शिरवळ जिल्हापरिषद गटामध्ये मतदारांनी राष्ट्रवादीचा घड्याळाचा गजर वाजविला आहे. प्रमुख्याने शिरवळमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने पक्ष स्थापनेनंतर प्रथमच विधानसभेत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.
भौगोलीक दृष्ट्या मोठा व राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाई मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे मकरंद पाटील, काँग्रेसतर्फे मदन भोसले, शिवसेनेकडून डी. एम. बावळेकर तर प्रथमच पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. दरम्यान राष्ट्रवादी शिवसेनेची उमेदवारी चित्र स्पष्ट झाले तरी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्थेचे वातावरण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाणवत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था झाली आहे. याचा परिणाम शिरवळ जिल्हा परिषद गटात शेवटपर्यंत जाणवला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वताची प्रचारयंत्रणा व नाराजांची नाराजगी दूर करीत एकजूटपणे आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. तर काँग्रेस, शिवसेना, भाजपामध्ये कार्यकर्त्यांची मने जुळवीताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. शिरवळ जिल्हापरिषद गटात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने यंदाच्या निवडणुकीत गरुड झेप घेतली.
यांदा मात्र काँग्रेसच्या मताधिक्यात घट होवून कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. पुरुषोत्तम जाधव यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले, तर डी. एम. बावळेकर यांना शिरवळ गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
राजकीय समीकरणे बदलणार?
विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील यांना तब्बल दोन हजारांचे मताधिक्य एकट्या शिरवळमधून मिळाले आहे. काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष गुरुदेव बरदाडे यांच्या होमपिचवर काँग्रेसचे घटलेले मताधिक्य काँग्रेसला आत्मपरिक्षण करायला लावणारे आहे. तर शिवसेनेला लागलेली गळती थोपविण्याचे काम उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांना करावे लागणार आहे. एकूणच आगामी काळात शिरवळ गटातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत.