वर्षातील पहिला टँकर पावसाच्या तालुक्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:29+5:302021-04-01T04:40:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाणीसाठे टिकून राहत ...

The first tanker of the year in the rain taluka ... | वर्षातील पहिला टँकर पावसाच्या तालुक्यात...

वर्षातील पहिला टँकर पावसाच्या तालुक्यात...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला आहे. तेही पावसाचा तालुका समजल्या जाणाऱ्या वाई तालुक्यात. तर दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात टँकर अद्याप सुरू झालेला नाही. दरम्यान, पावसाळ्यापर्यंत विचार करता यंदा पाणीटंचाईवर खर्च कमी होणार आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यात डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलेल आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटरकप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचे तुफान आलेले. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात तर जलसंधारणाची कामे मोठी झाली आहेत त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी अडून राहिले व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार आहे. याबाबतचा जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. प्रशासनाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे टंचाई आराखडे तयार केले आहेत. ऐन उन्हाळ्यात तर जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते; पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. त्यासाठी जवळपास अडीच कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांत टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या, तरीही गेल्यावर्षी सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाण्यासाठी टँकर सुरू होते. जिल्ह्यात यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत उशिरा टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यातील दोन गावे आणि तीन वड्यांसाठी हे टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये मांढरदेव, बालेघर, गडगेवाडीचा समावेश आहे. शासकीय दोन टँकरच्या माध्यमातून सहा खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत, तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत अजूनही टंचाई निवारणासाठी टँकर सुरू झालेले नाहीत.

चौकट :

२०१८-१९ ला टंचाईवर १९ कोटींचा खर्च...

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी जवळपास १९ कोटी रुपये खर्च आला होता. कारण, जवळपास २५० गावे आणि १ हजाराच्या वर वाड्यांसाठी ३०० च्या आसपास टँकर सुरू होते. तर साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून होती. तसेच पशुधनालाही टँकरचा आधार होता. त्या तुलनेत गेल्यावर्षी टंचाई कमी होती. याला कारण म्हणजे चांगला पाऊस. २०२० मध्ये अवघे २९ टँकर सुरू होते. याला कारणही पाऊस आणि जलसाठा टिकून असणे होय. यंदाही टंचाई कमीच राहणार आहे.

.........................................................................

Web Title: The first tanker of the year in the rain taluka ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.