पहिले पाऊल जबाबदारीचे!

By Admin | Updated: January 1, 2015 00:07 IST2014-12-31T23:06:45+5:302015-01-01T00:07:49+5:30

‘कँडल मार्च’ यशस्वी : सातारच्या तरुणाईने केला दहशतवादाचा धिक्कार

The first step is responsibility! | पहिले पाऊल जबाबदारीचे!

पहिले पाऊल जबाबदारीचे!

सातारा : चंगळवादी संस्कृतीच्या आहारी जाऊन नववर्षाचे स्वागत नशेत करणाऱ्या युवा पिढीला दोष द्यायला सगळेच पुढे सरसावतात; परंतु उगवती पिढी उगवत्या वर्षात उगवती स्वप्ने घेऊन अत्यंत जबाबदारीने पाऊल ठेवत असल्याचे सातारच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ‘थर्टीफर्स्ट’च्या संध्याकाळी काढलेल्या दहशतवादविरोधी ‘कँडल मार्च’ला विद्यार्थ्यांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हा त्याचाच पुरावा!
कोणत्याही संस्था, संघटना वा पक्षाचा झेंडा न घेता, जात-धर्म-पंथाचे बंधन न मानता जगभरातील दहशतवादी शक्तींचा निषेध करण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध आर-पार लढाईची मागणी करण्यासाठी विद्यार्थी एकत्र जमले होते. पेशावर येथील शाळेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या मृत्युतांडवात १२५ विद्यार्थ्यांचा बळी गेला, त्यांच्याशी केवळ विद्यार्थी म्हणून नाते सांगण्यासाठी मुले-मुली एकत्र आली होती. सोशल मीडियावरून तरुणांच्या वेगवेगळ्या ग्रुप्सना आवाहन करीत, त्यांच्या टोमणेवजा कमेन्ट्स झेलत, कॉलेजा-कॉलेजात पत्रके वाटत दोन विद्यार्थिनींनी या ‘कँडल मार्च’चे यशस्वी आयोजन करून दाखविले. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये शिकत असलेल्या वैष्णवी कारंजकर आणि अंकिता साळुंखे यांची ही संकल्पना फलद्रुप होत असताना प्रत्येक सहभागी युवक-युवतीच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान ओसंडत होते.
तालीम संघाच्या मैदानावरून सायंकाळी साडेसहा वाजता ‘कँडल मार्च’ला प्रारंभ झाला. मशाली आणि मेणबत्त्या चेतवून राजपथावरून मोती चौक आणि तेथून शिवाजी सर्कलपर्यंत काढलेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. फेरीच्या मार्गावरही अनेक चौकांत विद्याथी, विद्यार्थिनी फेरीत सहभागी होत होत्या. (प्रतिनिधी)

दुर्दैवी जिवांना श्रद्धांजली
‘कँडल मार्च’ शिवाजी सर्कल येथे पोचल्यावर तेथील कठड्यावर मेणबत्त्या लावून विद्यार्थी शिस्तीने वर्तुळ करून उभे राहिले. पेशावर येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही संस्थेच्या किंवा ठळक व्यक्तीच्या आवाहनाशिवाय जमलेल्या मुलांचे वैष्णवी आणि अंकिताने आभार मानले.

Web Title: The first step is responsibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.