‘कवठे-केंजळ’चा पहिला टप्पा कार्यान्वित
By Admin | Updated: May 31, 2014 00:32 IST2014-05-31T00:30:55+5:302014-05-31T00:32:33+5:30
टंचाईग्रस्त भागात आनंद : आचारसंहितेमुळे साध्या पद्धतीने कळ दाबून उद््घाटन

‘कवठे-केंजळ’चा पहिला टप्पा कार्यान्वित
कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील कवठे, सुरूर, चांदक केंजळपासून किकलीपर्यंतच्या सर्व भागासाठी वरदायिनी ठरलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंंचन योजनेचा पहिला टप्पा शुक्रवारी कार्यान्वित करण्यात आला. आचारसंहिता असल्याने अत्यंत सध्या पद्धतीने योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाणीपुरवठ्याचा प्रारंभ सुरूर येथील शंकरराव पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कळ दाबल्यानंतर पाणी मुख्य साठवणकुंडात साठविण्यात आले व तेथून दोन्ही मार्गांनी त्याचे वितरण सुरू झाले. सध्या केंजळ येथील तलावात हे पाणी साठविले जात असून, तलाव भरल्यावर पाण्याचे वितरण ओढ्यामार्फत कवठे, बोपेगाव भागात होणार आहे. सद्य:स्थितीत तालुक्याच्या पूर्व भागातील केंजळ-सुरूरसह सर्व गावांना पाणीपुरवठा करणार्या विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली असून कित्येक गावांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याने पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला. योजनेच्या निविदेची किंमत ६५.६५ कोटी असून गतवर्षी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. आजअखेर २७.५७ कोटींचा निधी या योजनेवर खर्च झाला आहे. ५० कोटींचा निधी चालू अंदाजपत्रकात मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस महिने कंत्राटदारांनी स्वत:च्या खर्चाने योजनेचे संचालन व देखभाल-दुरूस्ती करावयाची आहे. योजनेसाठी वीजपुरवठा सातत्याने मिळावा यासाठी वाईच्या औद्योगिक वसाहतीतून वीजजोड घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे पाणी मुख्य वितरण हौदापर्यंत पोहोचले असून ते शेंदूरजणे, परखंदी, लोहारे, बोपर्डी, सुलतानपूर भागात वितरित होईल. तसेच केंजळ, गुळुंब, सुरूर, कवठे, बोपेगाव या गावांनजीक असलेल्या तीन ओढ्यांना पाणी जाणार आहे. सध्याची या परिसरातील पाणीटंचाई असून, तेथील ग्रामस्थांची अडचण त्वरित दूर होणार आहे. पाणी सुरू झाल्याने शेतकर्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास शशिकांत पिसाळ, उदयसिंंह पिसाळ, प्रताप पवार, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, पंचायत समिती सभापती मनीषा शिंंदे, प्रमोद शिंंदे, पंचायत समिती सदस्य उमा बुलुंगे व रामचंद्र फरांदे, सत्यजित वीर, महादेव म्हसकर, मनीष भंडारी, दिलीप पिसाळ, अनिल जगताप, विलास गायकवाड, मोहन जाधव, रवी जाधव, रमेश गायकवाड, पांडेचे उपसरपंच किरण जाधव, दिलीप मोरे , नानासाहेब पार्लेकर, शिवाजी करपे, नाना देवकर, दादा पोळ, शशिकांत करपे, शिवाजी डेरे, सुधाकर डेरे, महादेव डेरे उपस्थित होते. महादेव म्हसकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)