महिला बचत गटांसाठी साताऱ्यात पहिली बाजारपेठ
By Admin | Updated: January 10, 2017 22:28 IST2017-01-10T22:28:48+5:302017-01-10T22:28:48+5:30
वेदांतिकाराजेंचा पुढाकार : बचतगट फेडरेशनमार्फत नवनवीन उद्योग व्यवसायांसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण

महिला बचत गटांसाठी साताऱ्यात पहिली बाजारपेठ
सातारा : महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर, बचतगटांना बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच राजमाता सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशन बचत गटांच्या मालासाठी साताऱ्यात पहिली हक्काची बाजारपेठ सुरू करत असल्याची घोषणा फेडरेशनच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केली.
शाहूपुरी येथे राजमाता सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या मेळाव्यात वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी फेडरेशनच्या संचालिका लता जाधव, सुदर्शना चव्हाण, संगीता देशमुख, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संगीता फल्ले, संगीता सपकाळ, मोहिनी चोरगे, उर्मिला कोरडे, उज्ज्वला निकम आणि कबड्डी पंच सायराबानू शेख यांचा वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सत्कार केला.
वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘फेडरेशनच्या माध्यमातून साताऱ्यातील पहिला बचत गट बझार सुरू करण्यात येत असून, यादोगोपाळ पेठ येथे हा बझार सुरू होणार आहे. यामध्ये महिला बचत गट आपला माल विक्रीसाठी ठेवतील. त्यासाठी बचत गटांकडे आवश्यक तो परवाना असणे आवश्यक आहे. या बझारमुळे बचतगटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.’
सुजीत शेख यांनी सुत्रसंचालन केले. वर्षा आतार यांनी आभार मानले. मेळाव्यास शहरासह तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
यासाठी मिळणार
मोफत प्रशिक्षण
वर्तमानपत्राच्या रद्दीतून लिफापे तयार करणे, पोळीभाजी, वडापाव, सामोसा केंद्र चालवणे, सणानुसार रुकवत तयार करणे, पोळी घरपोच देणे, पाळणा घर चालवणे यासारखे पर्याय बचत गटांनी शोधले पाहिजेत, असे पर्याय शोधल्यास बचत गटांना बचतीबरोबरच कायमची बाजार पेठ मिळणार आहे. बचत गटांच्या अडचणी सोडवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे. विविध प्रकारच्या उत्पादनासाठी महिला बचत गटांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी फेडरेशन मदत करणार असल्याचे वेदांतिकाराजे म्हणाल्या.
१७ जानेवारीला
हळदी-कुंकूचे आयोजन
मकरसंक्रांती सणानिमीत्त वेदांतिकाराजे भोसले यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या असून मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या कालावधीत सुरुची निवासस्थानी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सातारा शहर आणि तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.