आधी लोकवर्गणी... पुन्हा नळ जोडणी !
By Admin | Updated: December 29, 2014 23:36 IST2014-12-29T22:16:33+5:302014-12-29T23:36:47+5:30
माजगाव : नळ कनेक्शनसाठी निकृष्ट साहित्य; ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड

आधी लोकवर्गणी... पुन्हा नळ जोडणी !
चाफळ : माजगाव, ता.पाटण येथे ग्रामपंचायतीमार्फत राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम जोमात सुरु आहे. या कामात निकृष्ठ पध्दतीचे साहित्य वापरण्यात येत असून ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देवून सारवासारव केली जात आहे. या कारभाराची चौकशी करण्याची मागणी शंभूराज युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
माजगांव येथे चाळीस लाख रुपये किंंमतीच्या पेयजल योजनेचे काम सध्या सुरु आहे. सुमारे चाळीस लाख रुपयांचा निधी गावाला मिळण्यासाठी लोकवर्गणी म्हणून ग्रामस्थांनी दोन लाख रुपये शासनाकडे भरले आहेत. मात्र, नळ जोडणी करीत असताना प्रत्येक कुटुंबाकडुन नळ जोडणीच्या नावाखाली सहाशे रुपये आकारले जात आहेत. ग्रामस्थांनीही ते पैसे भरले आहेत; पण नळजोडणीच्या कामात साहित्य वापरत असताना संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट व हलक्या प्रतीचे साहित्य वापरण्यात येत आहे. तसेच साहित्याची मूळ किंंमत ३५० रुपये असताना ठेकेदाराकडून ६०० रुपये आकारले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला २५० रुपये भुर्दंड सोसावा लागत आहे. हे जादा आकारणी केले गेलेले हजारो रुपये कोणाच्या खिशात गेले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकाराची प्रशासनाने चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतच्या निवेदनावर शंभूराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
ग्रामस्थांची दिशाभूल
नळ कनेक्शन देताना लागणाऱ्या साहित्यासह खोदकाम व प्लंबिंग चार्ज असे मिळून ६०० रुपयांची आकारणी करण्यात आली आहे. या कामात पारदर्शकता असताना खोटा आरोप करुन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्येकाला पाण्याचे समान वाटप व्हावे, यासाठी एकाच दुकानातून हे साहित्य आणुन ठेकेदाराकरवी हे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
- पी. डी. पाटील, उपसरपंच, माजगांव