केबल वॉरमधून मिरजेत गोळीबार
By Admin | Updated: February 27, 2015 00:16 IST2015-02-26T22:39:39+5:302015-02-27T00:16:39+5:30
महापालिकेत पळापळ : एक जखमी; चौघांवर गुन्हा

केबल वॉरमधून मिरजेत गोळीबार
मिरज : मिरजेत महापालिकेच्या आवारात शिवसेना उपतालुकाप्रमुख विशालसिंग रामसिंग रजपूत याने आज (गुरुवारी) रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून दहशत निर्माण केली. विशालसिंग व किरणसिंग रजपूत बंधूंनी केलेल्या मारहाणीत प्रवीण सुनील देसाई जखमी झाला. केबल व्यवसायाच्या वादातून दोन गटात झालेली हाणामारी व गोळीबाराच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी विशाल रजपूत (वय ४२) व किरण रजपूत (४२, रा. दोघेही मंगळवार पेठ, मिरज) हे दोघे भाऊ महापालिकेत सुशिला देसाई यांच्या दारू दुकानाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यासाठी आले होते. याचवेळी तेथे आलेले बालाजी केबलचे संजय देसाई (३४), प्रवीण देसाई (३४, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) या बंधूंशी बाचाबाची झाली. रागाच्या भरात विशालने रिव्हॉल्व्हर झाडून प्रवीणवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेले समीर सय्यद, संजय देसाई, महिला पोलीस शिपाई मुडे यांनी त्यास रोखले. विशालने हवेत व जमिनीवर दोन फैरी झाडल्या. विशालचा भाऊ किरणने हातातील जाड चांदीचे कडे काढून प्रवीणच्या डोक्यात मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. महापालिका आवारात झालेल्या गोळीबाराचे वृत्त शहरात पसरले. पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे व पथक घटनास्थळी धावले. त्यांनी विशाल रजपूतला रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले.
संजय देसाई यांनी महापालिका कार्यालयात वृत्त संकलनासाठी आलो असता, केबल न्यूजवर विरोधात वृत्त दिल्याच्या रागातून विशाल रजपूतने गोळीबार करून व किरण रजपूतने प्रवीण यास मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. विशाल रजपूतने पूर्ववैमनस्यातून संजय व प्रवीण देसाई यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)