अग्निशमन यंत्रणेची दमछाक
By Admin | Updated: February 7, 2015 00:10 IST2015-02-06T22:47:03+5:302015-02-07T00:10:00+5:30
हिंगणेची भीषण आग आटोक्याबाहेर : बघ्यांना हलविताना पोलिसांची तारांंबळ

अग्निशमन यंत्रणेची दमछाक
वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील खासगी खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंग या बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीच्या साठा असणाऱ्या टाकीला भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये येथील कामगार सागर कृष्णा जगदाळे (वय २७, रा. राजाचे कुर्ले) हा जागीच ठार झाला.शुक्रवारी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास सागर जगदाळे हा वेल्डिंग कारागिर तेथील सहा टाक्यांपैकी एका टाकीवर वेल्डिंगचे काम करीत होता. प्राथमिक अंदाजानुसार ही आग वेल्डिंगच्या ठिणगीने लागली असल्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, या परिसरात आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. या घटनेची माहिती समजताच हिंगणे गावातील व वडूज येथील रानमळा परिसरातील लोकांनी धाव घेतली. परंतु, तत्पूर्वीचे या आगीच्या स्फोटामुळे टाकीचे झाकणासहित सागर जगदाळे दोनशे मीटर उडून जागीच मृत्यू पावला. घटनास्थळावरील आग आटोक्यात आणण्यासाठी फलटण नगरपरिषद, म्हसवड, नगरपालिका व गोपूज येथील ग्रीन पॉवर अॅण्ड शुगरचे अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या टाकीमध्ये केमिकल मिश्रितसारखे पदार्थ असल्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला. मात्र, आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. त्यावेळी शेजारीच असणाऱ्या दुसऱ्याही टाकीला आग लागली.या आगीचे स्वरूप लक्षात घेता आणि आग आटोक्यात येण्याची शक्यता नसल्याचे पाहून प्रशासनाने जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अग्निशमन दलास पाचारण केले. आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. सहा टाक्यांपैकी दोन टाक्यांने आग लागल्याने उर्वरित टाक्यांपासून शेजारी उभ्या आॅईलचा टँकर तातडीने घटनास्थळावरून हलविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गेआदी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर होते. (प्रतिनिधी)