हातपंपावर पाणी हापसून विझविली आग

By Admin | Updated: March 25, 2016 23:35 IST2016-03-25T21:19:51+5:302016-03-25T23:35:30+5:30

व्यापारी अन् युवकांच्या एकीचे दर्शन : पाचवडला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन फर्निचर दुकाने भस्मसात; ८ ते १० लाखांचे नुकसान

Fire extinguishes the water on the hand pump | हातपंपावर पाणी हापसून विझविली आग

हातपंपावर पाणी हापसून विझविली आग

पाचवड : पाचवडच्या मुख्य बाजारपेठेतील दोन फर्निचर दुकाने शॉर्टसर्किटमुळे लागेल्या आगीत खाक झाली. गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे बाजारपेठेतील सर्व व्यापारी व युवकांमध्ये असणारी एकी दिसून आली. फर्निचर दुकानाला आग लागल्याचे पाहून बाजारपेठेतील व्यापारी व सुमारे शंभरहून अधिक युवक एकत्र आले. अग्निशमन दलाची वाट न पाहता दुकानासमोरील हातपंपावर पाणी हापसून बादली व हांडे भरून सर्वजण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. ही एकी पाहून अनेकजण भावुक झाले.
पाचवडच्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या कृष्णाई व कृष्णामाई या फर्निचर दुकानांना शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील सुमारे ८ ते १० लाखांचा माल जळून खाक झाला. लाकडी व प्लायवूडचे टेबल, कपाटे, सोफासेट, गाद्या तसेच प्लास्टिकचे फर्निचर आदी साहित्य असलेल्या या दुकानाने क्षणात मोठा पेट घेतल्याने बाजारपेठेत हाहाकार उडाला. उंचच्याउंच ज्वाळा दुकानाबाहेर आग ओकत असल्याने शेजारील इतर दुकानदारांचेही चांगलेच धाबे दणाणले.
अशा बिकट परिस्थितीत शेजारील दुकानांचे संरक्षण करण्यासाठी सर्व व्यापारी तसेच पाचवडच्या युवकांनी एकत्र येऊन अग्निशमन दलाची वाट न पाहता दुकानासमोरच असणाऱ्या पाण्याच्या हातपंपावरून पाणी आणून दुकानावर पाण्याचा मारा करून आग इतरत्र पसरू न दिल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच भुर्इंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दल पाचारण करून संपूर्ण आग आटोक्यात आणली.
संतोष सदाशिव पार्टे व त्यांचे बंधू रामदास पार्टे या दोघांच्या मालकीचे कृष्णाई व कृष्णामाई फर्निचर ही दोन्ही दुकाने एकमेकाला लागून पाचवडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहेत. गुरुवारी दिवसभराचे काम संपवून दोघेही सुमारे ९.३० वाजता आपली दुकाने बंद करून दुकानाच्या पाठीमागेच आपल्या निवासस्थानी गेले. त्यानंतर काही वेळाने दुकानात धूर येऊ लागल्याने त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानगाळ्यांचे शटर उघडेपर्यंत आतील बहुतांशी साहित्याने पेट घेण्यास सुरुवात केली होती. आजूबाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांनी व स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्यापरीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु प्लास्टिक व प्लायवूडच्या साहित्याने पेट घेऊन आगीचा भडका मोठा झाल्याने या सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले.
दरम्यान, काही ग्रामस्थांनी भुर्इंज पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून भुर्इंज पोलिस ठाण्याचे संपूर्ण पोलिस दल तसेच आपत्कालीन पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर आगीचे रौद्ररूप पाहून सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार यांनी घटनास्थळापासून जवळचे असणारे किसन वीर कारखान्याचे अग्निशमन दल प्रथम पाचारण करून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातारा नगरपालिकेचे अग्निशमन दल व महाबळेश्वर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने संपूर्ण आटोक्यात आणली.
या घटनेमुळे पार्टे कुटुंबीयांची मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी तहसीलदार अतुल म्हेत्रे आपल्या महसूल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)


महावितरणचा कारभार चव्हाट्यावर
पाचवड या मुख्य बाजारपेठेत गेल्या तीन वर्षांत वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किटच्या तीन घटना घडल्या असून, यामुळे महावितरणच्या शाखा अभियंता व त्यांच्या सहकार्यांचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस अगोदरच ‘लोकमत’ने बाजारपेठेतील चपला-बुटांचे दुकान, हॉटेल्स, मोबाईल शॉप्स तसेच बाजारपेठेतील घरांमधील इलेक्ट्रॉनिकचे बरेचसे साहित्य वीजेच्या उच्चदाबामुळे जळून खाक झाले असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु ही घटना महावितरणच्या पाचवड शाखेने गांभीर्याने न घेतल्याने आजची ही घटना घडली का? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.


...अन्
मोठा
अनर्थ टळला
आपल्या मित्राच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच पाचवडचे सरपंच महेश गायकवाड जेवत्या ताटावरून उठून मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. जमलेल्या व्यापारी व युवकांना सोबत घेऊन आग अटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी पेट घेतलेल्या दुकानातील घातक सिलिंडर जीवावर उदावर होऊन घटनास्थळापासून दूर नेऊन फेकल्याने बाजारपेठेतील मोठा अनर्थ टळला.

Web Title: Fire extinguishes the water on the hand pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.