घराला आग लागून तीन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 13, 2014 00:31 IST2014-05-13T00:31:23+5:302014-05-13T00:31:23+5:30
एकसर : घातपाताचा संशय व्यक्त

घराला आग लागून तीन लाखांचे नुकसान
वाई : एकसर (मालुसरेवाडी), ता. वाई येथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या आगीत घरातील सर्व साहित्य जळाले असून दोन लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, एकसर येथील आनंदा मारुती गोळे यांच्या घराशेजारी गवताच्या गंजीला रात्री अकराच्या सुमारास आग लागली. यावेळी गोळे हे घरात कुटुंबासह टीव्हीवरील कार्यकम पाहत होते. गंजीला लागलेली आग बघता-बघता घरापर्यंत आली. संपूर्ण घराला आग लागली. प्रसंगावधान राखून घरातील सर्वजण बाहेर पडले. यावेळी आग विझविण्यासाठी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. पण घरावर पत्रा असल्याने पाणी आगीपर्यंत जात नव्हते. त्यातच धुराचा लोटही निर्माण झाल्याने पुढेही जाता येत नव्हते. त्यामुळे आग विझवता येत नव्हती. या आगीत घरातील भांडी, धान्य, रेशनिंग कार्ड, जमिनीची कागदपत्रे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी जळून खाक झाले आहे. तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या आगीत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. (प्रतिनिधी)