फटाक्यानं रोपं जळाली.. वधुपित्यानं पुन्हा लावली!-- लोकमत विशेष
By Admin | Updated: April 20, 2016 00:23 IST2016-04-19T23:19:15+5:302016-04-20T00:23:30+5:30
लग्नाच्या वरातीतील प्रताप : संतप्त सातारकर पोलिस ठाण्यात पोहोचताच वऱ्हाडी मंडळीकडून तातडीनं चूक दुरुस्त :

फटाक्यानं रोपं जळाली.. वधुपित्यानं पुन्हा लावली!-- लोकमत विशेष
सातारा : लग्नाच्या वरातीतील उत्साही वऱ्हाडी मंडळींनी लावलेल्या फटाक्यांमुळे रस्तादुभाजकातील शंभर रोपं जळून खाक झाली. हे पाहून हळहळलेल्या काही सर्वसामान्य सातारकरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं संबंधित वऱ्हाडी मंडळींना बोलावून घेताच त्यांनी जळालेली सर्व रोपं परत लावून देण्याचं कबूल केलं. लगेच रस्तादुभाजकातील जळालेली रोपं बाजूला काढून त्याठिकाणी नवी रोपं लावण्यात वधुपित्यानंच पुढाकार घेतला.एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशी घटना सातारा शहरातील विसावा नाका परिसरात घडली. राष्ट्रीय महामार्गापासून ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्तादुभाजकात नुकतीच काही रोपं लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुष्कर मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वरात निघताना या दुभाजकातच फटाक्याची भलीमोठी माळ पेटविली. यात शंभरपेक्षाही जास्त नाजूक रोपं अक्षरश: जळून खाक झाली. हे पाहून आजूबाजूचे नागरिक हळहळले. यातीलच एक उद्योजक प्रशांत मोदी यांना राहवले नाही. त्यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनीही सातारकरांच्या भावना समजून घेऊन तत्काळ पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव करून देताच संबंधित व्यवस्थापकानेही तातडीने संबंधित वऱ्हाडी मंडळींशी संपर्क साधला.
रिझर्व्ह बँकेत कामाला असलेले वधुपिता सुभाष फडतरे यांनी पोलिस ठाण्यात चूक कबूल केली अन् जळालेल्या रोपांची नुकसानभरपाई करून देण्यासाठी याच ठिकाणी
दुप्पट रोपं लावण्याचा शब्द
दिला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी रोपं लावण्यास प्रारंभ झाला.
यावेळी प्रशांत मोदी, आशिष जेऊरकर, विपुल मोरे, प्रशांत पवार, अमित कांबळे, जावेद डांगे अन् सारंग गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाटल्याही जळून खाक..
विसावा नाका परिसरातील रस्तादुभाजकात लावण्यात आलेली रोपं जगविण्यासाठी ‘रयत पॅरेंटस्’ परिवाराने याठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचीही सोय केली होती. या बाटल्याही फटाक्यांच्या उष्णतेमुळे जळून खाक झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा याठिकाणी बाटल्या लावण्यासाठी ही मंडळी मोठ्या जिद्दीने कामाला लागली आहेत. विशेष म्हणजे, पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनानेही या परिसरातील रोपांना स्वत:हून रोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांची भावनिकता
खून, मारामाऱ्यांसारख्या गंभीर प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिस खाते व्यवस्थित पुढाकार घेत नाही, अशी तक्रार बऱ्याच वेळा केली जाते. मात्र रोपांसारख्या छोट्याशा भावनिक प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी ज्या पद्धतीने संबंधितांना कामाला लावले, ते पाहून पोलिस खात्यातील भावनिकता अद्याप जिवंत असल्याचाच अनुभव सातारकरांना आला.