तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात आगीचा डोंब
By Admin | Updated: November 15, 2015 01:03 IST2015-11-15T01:01:35+5:302015-11-15T01:03:11+5:30
पाचगणीत दुकान खाक : तीन दुकानांनाही झळ

तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात आगीचा डोंब
पाचगणी : ऐन दिवाळीमध्ये जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही आगडोंब उसळला असून, पाचगणी येथील भाजी मंडईतील एका दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याची झळ बाजूच्या तीन दुकानांना बसली असून, यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन अग्निशमन बंब व एक खासगी टँकर आग विझविण्यासाठी तीन तास प्रयत्न करीत होते.
पाचगणी पालिका हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भाजी मंडईतील एका दुकानाला आग लागल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. प्रत्यक्षदर्शीने याची माहिती पोलीस ठाणे व शेजारील लोकांना दिली. त्यानंतर तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी, पाचगणी व महाबळेश्वर पालिकांचे अग्निशमन बंब, अजय बोरा यांचा पाण्याचा टँकर दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये दिनकर रामचंद्र शिंदे यांचे तीन हजार रुपये, दीपक अनंत कासुर्डे यांचे ४५ हजार ८०० रुपये, बबन दिनकर शिंदे यांचे ३९ हजार ४०० रुपये, अल्ताफ इस्माईल बागवान यांचे दुचाकीसह ७९ हजार ९०० रुपये, संजय हरिभाऊ राजपुरे यांचे ९० हजार ५०० रुपये, गणेश बाबूराव वाडकर यांचे ४९ हजार रुपये, संतोष हरिभाऊ राजपुरे यांचे २९ हजार १०० रुपये, बाळकृष्ण आनंदा कासुर्डे यांचे १४ हजार ५०० रुपये असे सुमारे तीन लाख ५१ हजार दोनशे रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर व नगरसेवक आणि मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी पाहणी केली व जळीतग्रस्त भाजी विक्रेत्यांना दिलासा दिला. (प्रतिनिधी)
सर्व सामान खाक !
आगीत सर्व भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला, भाजीचे कॅरेट, वजनकाटे, साहित्य, फर्निचर, पत्रा शेड, लाकडी बाकडे व इतर साहित्य जळून खाक झाले. अल्ताफ बागवान यांची दुचाकी (एमएच ११ पी २८४३) जळाल्याने १५ हजारांचे नुकसान झाले.