कऱ्हाड : गॅस पाइपलाइनच्या गुदामाला आग लागून पाइप व केबल जळून खाक झाले. गोटे, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी (दि. २३) दुपारी ही घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील सेवा रस्त्यावर गत अडीच ते तीन वर्षांपासून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. एका कंपनीकडून हे काम सुरू असून, कंपनीने पाइपलाइन टाकण्यासाठी ठेकेदारास ठेका दिला आहे. संबंधित ठेकेदाराने कऱ्हाडजवळील गोटे गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गालगत गॅस पाइपलाइनसाठी आवश्यक पाइप, केबल, कॉम्प्रेसर यासह अन्य साहित्य ठेवले होते.दरम्यान, गुरुवारी दुपारी अचानक या परिसरात आग लागली. परिसरात वाळलेले गवत, झाडी होती. तसेच केबल व पाइपला प्लॅस्टिक कोटिंग असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांसह कऱ्हाड पालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमक दलाला दिली. मात्र, तोपर्यंत आग भडकली होती.धुराचे लोट हवेत पसरले होते. काही वेळातच कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दलासह दोन टँकर त्याठिकाणी पोहोचले. कृष्णा हॉस्पिटलचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वानराने उडी मारल्यामुळे ठिणग्यागॅस पाइपलाइनच्या साहित्याचे गुदाम असलेल्या परिसरात वीज ट्रान्सफॉर्मर आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास याच ट्रान्सफाॅर्मरवर एका वानराने अचानकपणे उडी मारली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ट्रान्सफाॅर्मरनजीक गवत असल्यामुळे आग भडकल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.