सातारा : सातारा शहरात सोमवारी (दि. ९) नागरिकांना अक्षरशः आगडोंब पाहायला मिळाला. सोनगाव येथील पालिकेच्या कचरा डेपोत भीषण आग लागल्याने धुराचे लोट सर्वदूर उसळले; तर दुसरीकडे समृद्ध हिरवाईने नटलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावरही विघ्नसंतोषींकडून वणवा पेटविण्यात आला. एका बाजूला विषारी धूर आणि दुसऱ्या बाजूला धगधगणारा वणवा, अशा गंभीर परिस्थितीत सातारकरांचा श्वास गुदमरला. सोनगाव डेपोतील आगीमुळे दृश्यमानता कमी झाल्याने सातारा-शेंद्रे मार्गावरील वाहनधारकांना दिवसा हेडलाईट लावून प्रवास करावा लागला.साताऱ्याच्या पर्यावरणाला आगीच्या दोन मोठ्या संकटांनी एकाच वेळी वेढले. दुपारच्या सुमारास सोनगाव येथील कचरा डेपोत अचानक आग लागली. कचऱ्यातील प्लास्टिक आणि रसायनांमुळे या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. या आगीतून निघणाऱ्या काळ्याकुट्ट धुराने सातारा-शेंद्रे मार्गाचा ताबा घेतला. अगदी १० ते १५ फुटांवरील रस्ताही दिसेनासा झाल्याने वाहनधारकांची मोठी धांदल उडाली. अपघाताच्या भीतीने चालकांनी हेडलाईट सुरू करून संथ गतीने मार्ग काढला, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.
अनेक वर्षांनंतर उद्भवली परिस्थिती..सोनगाव कचरा डेपोतील आगीच्या घटना गेल्या चार-पाच वर्षांपासून थंडावल्या होत्या. पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे राबवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी उसळलेल्या या आगडोंबाने ग्रामस्थांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. पाच-सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच भयावह अनुभव वाहनधारक व ग्रामस्थांना आला.
आग लागली की लावली?उन्हाळ्याची चाहूल लागताच कचरा डेपोत आगीचे सत्र सुरू होते. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो, जो कडक उन्हाच्या संपर्कात येताच पेट घेतो, असे तांत्रिक कारण सांगितले जाते. मात्र, सोमवारी लागलेली ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की, कुणी मुद्दाम लावली? याबाबत आता परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
अजिंक्यताऱ्यावरील जैवविविधता खाक..एकीकडे कचरा डेपोचा धूर नागरिकांचा श्वास गुदमरत असतानाच, सातारचे वैभव असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावरही विघ्नसंतोषींकडून वणवा पेटविण्यात आला. हिरवाईने नटलेला ऐतिहासिक किल्ला आगीच्या विळख्यात सापडल्याने निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
..तर मे महिन्यात काय?उन्हाळा आता कुठे सुरू झाला असतानाच शहराच्या दोन्ही बाजूंनी आगीचे लोळ उठू लागल्याने सातारकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अजून दोन महिने तीव्र उन्हाळा असणार आहे. जर सुरुवातीलाच ही परिस्थिती असेल, तर ऐन मे महिन्यात काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिका प्रशासन आणि वनविभागाने तातडीने कठोर पावले उचलून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Web Summary : Satara choked as a massive fire engulfed the Songaon garbage depot and vandals set Ajinkyatara Fort ablaze. Toxic smoke reduced visibility, disrupting traffic. Residents fear worsening conditions with the approaching summer and demand action from authorities.
Web Summary : सतारा में सोनगाँव कचरा डिपो में भीषण आग और अजिंक्यतारा किले में आग लगने से शहर में धुंध छा गई। जहरीले धुएं से दृश्यता कम हुई, यातायात बाधित हुआ। निवासियों को गर्मी में स्थिति बिगड़ने का डर है और प्रशासन से कार्रवाई की मांग की है।