अग्निदेवता कोपली
By Admin | Updated: February 8, 2015 00:52 IST2015-02-08T00:51:36+5:302015-02-08T00:52:53+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी भडका : अग्निशामक दलाची तारांबळ

अग्निदेवता कोपली
सातारा : कालच कोरेगाव येथे एक दुकान भीषण आगीत भस्म झाले तर खटाव तालुक्यातील हिंगणे येथे इथेनॉल प्रकल्पाला आग लागून एकाचा मृत्यू झाला. या घटनांना एक दिवस होतो न होतो तोच आज (शनिवारी) पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून जनावरांचा चारा खाक झाला. तर कऱ्हाड तालुक्यातील विद्यानगर येथे आगीत दुकान जळाले. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध ठिकाणी अग्निदेवता कोपल्यामुळे तिच्या झळांनी नागरिक आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत.
कवठेत सहा एकर ऊस जळाला
मसूर : कवठे, ता. कऱ्हाड येथील फडनिशी नावाच्या शिवारात अचानक आग लागून सुमारे साडेसहा एकरातील ऊस जळून १२ शेतकऱ्यांचे मिळून ६ लाख ३८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, कवठे येथील फडनिशी नावाच्या शिवारात दुपारी बाराच्या सुमारास अचानकपणे उसाच्या फडांना आग लागली. ही आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले.
शिवारातील शेतकरी संजय रामचंद्र साळुंखे, रामचंद्र भिकोबा शिंंदे, साहेबराव विठ्ठल साळुंखे, सुरेश तुकाराम साळुंखे, धनाजी श्रीपती घार्गे, हणमंत कुंडलिक साळुंखे, लक्ष्मण शंकर साळुंखे, विठ्ठल बळवंत साळुंखे, प्रमिला प्रकाश साळुंखे, समाधान गोरख साळुंखे, हणमंत केसू साळुंखे आदी शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकरातील उस जळून खाक झाल्याने सर्वांचे मिळून ६ लाख ३८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
आगीच्या या घटनेची खबर विठ्ठल बळवंत साळुंखे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून अधिक तपास सहायक फौजदार प्रकाश कोकाटे करत आहेत. (वार्ताहर)