निर्यात केंद्राचे काम वेळेत पूर्ण करा
By Admin | Updated: January 2, 2015 00:12 IST2015-01-01T21:52:29+5:302015-01-02T00:12:57+5:30
शिवेंद्रसिंहराजे : बांधकामाची पाहणी करुन अधिकाऱ्यांना केल्या सूचना

निर्यात केंद्राचे काम वेळेत पूर्ण करा
सातारा : ‘सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फुले व इतर मालाची जपणूक करण्यासाठी अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेच्या पुढाकाराने नवीन औद्योगिक वसाहत येथे अत्याधुनिक अशा फुले निर्यात सुविधा केंद्राची उभारणी केली जात आहे. या केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत तडजोड न करता काम वेळेत पूर्ण करावे,’ अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
येथील नवीन औद्योगिक वसाहतीत अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेच्या फुले निर्यात सुविधा केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय घोरपडे, संचालक डॉ. राजेंद्र सरकाळे, राहुल पवार, कृषिभूषण मनोहर साळुंखे, नथू कापले, संजय शिंदे, सागर फरांदे, पद्मसिंह फडतरे, व्यवस्थापक बाळासाहेब निकम आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा टिकून राहावा, मालाला चांगला दर मिळावा, यासाठी अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने व शासनाच्या सहकार्यातून फुले निर्यात केंद्राची उभारणी केली जात आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी सव्वासात कोटी निधी उपलब्ध झाला असून, या केंद्राच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास या केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे. दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी या निर्यात सुविधा केंद्राची उभारणी होत आहे. कामाचा दर्जा सांभाळण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)