खटाव : कोरोनाचा वाढता धोका व वाढता संसर्ग रोखण्यासाठी विना मास्क बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाच्यावतीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना गेला अशा अविर्भावात बेफिकीरपणे फिरणाऱ्या लोकांना तोंडावर मास्क बांधणे नको वाटू लागले आहे. परंतु कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. प्रशासनाच्यावतीने सूचना देऊनही नागरिकांचा बेफिकिरीपणा वाढतच असल्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने नुकतेच रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्यावतीने खटावमध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अचानक पाचशे रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडाली होती.
नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतरचे पालन करणे अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. परंतु याला केराची टोपली दाखवून नागरिक बेफिकिरपणे रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. खटावमध्ये अशा बेजबाबदार नागरिकांविरुद्ध पाचशे रुपये दंड आकारून कारवाई करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पुसेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे पोलीस ठाण्यातर्फे होत असलेल्या कारवाईमुळे आता कधीही आपल्याला नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते हे नागरिकांच्या लक्षात आले आहे.
कोरोनाशी सारा देश लढा देत असताना आपण त्याचा प्रतिकार करण्यासाठी साधे नियम पाळू शकत नाही. सर्वच नागरिक असे करतात असे नाही. परंतु जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. याकरिता प्रशासनाला आता कठोर कारवाई करावी लागत आहे. नागरिकांनी मास्क घालावा आणि स्वतःची खबरदारी घ्यावी. यासाठी नाईलाजास्तव ही कारवाई करावी लागत असल्याचे पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले.
२३खटाव-मास्क
खटावमध्ये विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांची करडी नजर असून अशा नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. (छाया : नम्रता भोसले)