अडीच महिन्यांत अडीच लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:20+5:302021-05-23T04:39:20+5:30
रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. गेल्या अडीच महिन्यांत शासकीय नियमांचे ...

अडीच महिन्यांत अडीच लाखांचा दंड वसूल
रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. गेल्या अडीच महिन्यांत शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून अडीच लाखांचा दंड वसूल केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरासह जिल्हाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संसर्गवाढीची गती वाढल्याने अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत. एक-दोन दिवसांत वाढणारे बाधितांचे आकडे पाहून डोके चक्रावत आहे. संसर्ग रोखण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस दलही ठोस पावले उचलत आहे. विनामास्क रस्त्यावरून पायी व दुचाकींवर फिरणे, मॉर्निंग वॉक करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, निर्धारित वेळेनंतर दुकान उघडे ठेवणे, रस्त्यावर भाजीपाला व फळे विक्री करून अनेकांकडून कोरोना संसर्गाला पोषक वातावरण बनवले जात आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर अडीच महिन्यांत दंडात्मक स्वरूपात अडीच लाख रुपये वसूल केले आहेत.
विनाकारण फिरणाऱ्या अनेक दुचाक्या जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक दिवसांपासून धूळखात पडून आहेत. वारंवार आवाहन करूनही आदेश धुडकावत रहिमतपूर ते अपशिंगे फाटा रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या लोकांची पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्याच्या दारात अनेकदा वरात आणली आहे. त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे. रहिमतपूर येथील गल्लीबोळांत गटागटाने बसणाऱ्या युवकांना अनेकदा प्रसाद देऊन पांगवलेले आहे. कारवाईच्या निमित्ताने नुकतेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी गल्लोगल्ली भिरकीट लावली आहे.
चौकट :
नियम मोडणाऱ्यांना सोडणार नाही
कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे; परंतु काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करावे. विनाकारण विनामास्क घराबाहेर पडून शासकीय नियम मोडणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला.
फोटो :
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पोलिसांनी कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी सायंकाळी रस्त्याने फिरणाऱ्या लोकांना पोलीस ठाण्याच्या दारात बसवले होते. (छाया : जयदीप जाधव)