दगडाचे कण रगडता मुबलक वाळू मिळे
By Admin | Updated: August 14, 2014 22:38 IST2014-08-14T21:13:53+5:302014-08-14T22:38:21+5:30
बांधकाम क्षेत्रात नदीच्या वाळूपेक्षा दगडाच्या वाळूस अधिक पसंती

दगडाचे कण रगडता मुबलक वाळू मिळे
वाठार स्टेशन : बांधकाम क्षेत्रात सिमेंट, वीट, स्टील, दगड, खडी या पेक्षाही वाळूची गरज मोठी असते; परंतु सध्या ही नदीची वाळू मिळवणे कठीण बाब व खर्चाची बाब झाल्याने या वाळूऐवजी आता दगडाच्या वाळूचा (स्टोन क्रश) सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी पसंती दिली आहे. यामुळे भविष्यात नदीच्या वाळूस दगडाची वाळू हा सर्वोत्तम पर्याय ठरणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
घर बांधकामाबरोबरच, पाणलोट बंधारे, सिमेंट बंधारे यासाठी वाळूची गरज लागते. मात्र, सध्या वाळूचे वाढलेले दर यामुळे ही वाळूखरेदी करणे व साठा करणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. याऐवजी वाळूच्या निम्म्या खर्चातच दगडाची वाळू मिळत असून, नदी वाळूपेक्षाही या वाळूचे काम भक्क्म व मजबूत होत असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात.
नदीची वाळू ही माताड येत असल्याने बांधकामासाठी प्लास्टरला तडे जाण्याचे प्रकार वाढत आहे. याशिवाय वाळूतील मातीच्या कणामुळे सिमेंटही ज्यादा वापरावे लागते. यापेक्षा दगड वाळूत केलेले बांधकाम हे भक्कम असल्याचे पुरावेही बांधकाम व्यावसायिक देत आहेत.
मात्र, नदीच्या एक ब्रास वाळूसाठी ४७०० ते ५००० पर्यंत रक्कम मोजावी लागते. तर दगडाच्या वाळूसाठी २५०० ते २७०० रुपये लागतात हा विचार करता जवळपास ५० टक्के खर्चाची यामधून बचत होत असल्याने बांधकामाचा खर्च ही कमी होतो. पर्यायाने घरांच्या किमतीही यामुळे कमी होतात. याचा फायदाही सर्वसामान्याला होतो.
जिल्ह्यातील अनेक स्टोन क्रशर्समधून ही दगड वाळू आता जिल्हाभर उपलब्ध होत असल्याने भविष्यातील बांधकाम क्षेत्रात नदीच्या वाळूस दगडाची वाळू हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. (वार्ताहर)
स्टोन क्रशर्स मधील दगडवाळू ही बांधकामास योग्य असून, या प्रक्रियेत जो दगड यासाठी वापरात येतो तो दगड जितका कठीण असेल त्याची वाळूही चांगल्या दर्जाची असून, ते बांधकामही भक्कम होते. दोन्ही वाळूतील दरांचा व भक्कमतेचा विचार केल्यास दगड वाळू हीच चांगली आहे.
- शशिकांत धुमाळ,
सिव्हिल इंजिनिअर