बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने सामान्यांचे हाल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:34+5:302021-06-04T04:29:34+5:30
पुसेगाव : ‘राजाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, ‘किंबहुना अशीच अवस्था सर्वत्र झाल्याचे दिसते आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता ...

बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने सामान्यांचे हाल..
पुसेगाव : ‘राजाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, ‘किंबहुना अशीच अवस्था सर्वत्र झाल्याचे दिसते आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता जास्त जाणवत आहे,
शेतकऱ्यांसह, पेन्शनर, सर्वसामान्याला तसेच ज्याच्या घरातील कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये असणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या बँकांनीही कोरोनाकाळात छळायचे धरले आहे. वाढलेल्या लॉकडाऊनमुळे एकाही व्यक्तीला स्वतःचे पैसे बँकेतून गरज असतानाही मिळत नाहीत, त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक नाडी बंद पडायची वेळ प्रशासनाने का आणली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सर्वच स्तरातील नागरिकांना मेटाकुटीला आणले आहे. कित्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना काही वेळा बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. रुग्णाला अॅडमिट करताना तसेच डिस्चार्ज होताना नातेवाइकांना रोख रक्कम भरावी लागत आहे. जवळ पैसेच नसतील तर त्यांनी काय करावे, सध्या शेतात आले लागवडीबरोबरच खरीप हंगामाची सुगी सुरू होत आहे. पैसे दिल्याशिवाय मजूर कामाला येत नाहीत, ट्रॅक्टर मिळत नाही, खते, बियाणे उधार मिळत नाहीत, शेतकरी लाखो रुपये घरात साठवून ठेवतो, अशी प्रशासनाची धारणा आहे का, की तेच पैसे घेऊन सर्व काही देणे भागवू शकेल? एकवेळ नोकरदारांना उधार मिळू शकते. कोरोनाकाळात किराणासह, पिठाच्या गिरण्याही प्रशासनाने बंद ठेवल्या आहेत. कोरोनाने अर्धमेला झालेला सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरेल का? अशी भीती वाटू लागली आहे.
कोट..
कोरोनामुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर नागरिकांचे प्रशासनाने धिंडवडे काढले आहे. स्वतःचे पैसे असूनही गरजेला मिळेना झालेत, शासनाच्या व सहकारी बँका आतल्या आत कारभार करत आहेत. ग्राहकांची दारे पूजणारे आज बँकेच्या दारातून हाकलत आहेत. पतसंस्था, खासगी वित्तसंस्था प्रशासनाने बंद ठेवल्या. एटीएममध्ये पैसे नाहीत, तर काहींचे शटर बंद, आम्ही जगावं की मरावं? कोरोना संपल्यावर जर याच सर्वांनी बँकांकडे पाठ फिरवली तर चालेल का? सर्वांना कामापुरती का होईना; पण रोख रक्कम बँकेतून मिळालीच पाहिजे.
-विश्वनाथ नलवडे, सेवानिवृत्त शिक्षक, पुसेगाव