.. अखेर पाचवड-कलेढोण रस्त्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:27+5:302021-01-10T04:30:27+5:30
मायणी : पाचवड-मुळीकवाडी-कलेढोण मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले होते. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने अखेर ...

.. अखेर पाचवड-कलेढोण रस्त्याच्या कामाला प्रारंभ
मायणी : पाचवड-मुळीकवाडी-कलेढोण मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले होते. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने अखेर काम सुरू केल्याने पाचवड ग्रामस्थ व ‘लोकमत’च्या लढ्याला यश आले.
पाचवड-मुळीकवाडी व कलेढोण हे सुमारे दहा किलोमीटरचे अंतर मुरमीकरण, खडीकरण व डांबरीकरण असे मंजूर करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून संबंधित ठेकेदार विविध कारणे पुढे करून या मार्गाचे काम करण्यास टाळाटाळ करीत होता. तसेच गेल्या महिन्यांमध्ये संबंधित ठेकेदारास अधिकारी पाठिंबा देत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊन रखडलेले काम मार्गी लावण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नव्हते. रखडलेल्या कामामुळे व खराब रस्ता यामुळे विद्यालय, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता. या अडचणी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने याबाबत १९ डिसेंबरच्या अंकात रखडलेल्या कामाचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने रखडलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन पाचवड ग्रामस्थांना दिले. पाचवड गावाच्या ग्रामपंचायतीसमोर कामासाठी लागणाऱ्या मशिनरी आणून ठेवल्या व शनिवारी अखेर प्रत्यक्ष कामाला सुरू केले. येत्या काही दिवसांत हा संपूर्ण सुमारे दहा किलोमीटरचा कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड मार्ग चांगल्या पद्धतीने तयार होईल, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
०९मायणी रस्ता
दोन वर्षांपासून रखडलेले पाचवड-कलेढोण रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले. (छाया : संदीप कुंभार)