अखेर पोलिसांनी पुढाकार घेऊन मुजवले खड्डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:20+5:302021-08-29T04:37:20+5:30
मायणी : मायणी-विटा राज्यमार्गावर मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर जिल्हा हद्दीवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे अखेर पोलीस विभागाने मुजवले. मात्र, ...

अखेर पोलिसांनी पुढाकार घेऊन मुजवले खड्डे!
मायणी : मायणी-विटा राज्यमार्गावर मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर जिल्हा हद्दीवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे अखेर पोलीस विभागाने मुजवले. मात्र, या पडलेल्या खड्ड्यांवर डागडुजी करण्याचे काम असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘खड्ड्यांमुळे मायणी-विटा राज्यमार्ग ठरतोय कर्दनकाळ’ असे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाले होतेे. मात्र, हा मार्ग जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या अखत्यारित येत नसल्यासारखीच गांधारीची भूमिका संबंधित विभाग घेताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील विशेष करून मायणी परिसरातून जाणाऱ्या या राज्यमार्गावर सातारा जिल्हा हद्दीपासून ते बनपुरी गावापर्यंत हजारो खड्डे पडले आहेत. या पडलेल्या खड्ड्यांवरून रोज शेकडो लहान-मोठी वाहने धावत आहेत.
या सुमारे १५ ते २० किलोमीटर राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होतच आहे. शिवाय रोज लहान-मोठे अपघात सतत घडत आहेत. अनेक प्रवासी या खड्ड्यांमुळे जखमी होत आहेत. मात्र, तरीही या मार्गावरील मार्गाची डागडुजी करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित विभागाकडून काही ठोस नियोजन होताना दिसत नाही. मार्गावर लहान-मोठे अपघात झाले, तर जखमींना रुग्णालयापर्यंत नेणे तसेच त्यांचे वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यापर्यंत सर्व कामे पोलीस विभागाला करावी लागत आहे.
सांगली-सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर जवळजवळ दोन फूट खोल व तीन ते चार फूट लांबीचा खड्डा पडला होता, तसेच या खड्ड्याजवळ शेकडो लहान-मोठे खड्डे पडले होते, हे खड्डे कर्दनकाळ ठरतायत, असे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मायणी पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी योगेश सूर्यवंशी व महेंद्र खाडे यांनी या ठिकाणी पडलेले खड्डे मुरूम टाकून भरले. पोलिसांनी खड्डे भरल्यामुळे पोलीस विभागाचे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक कौतुक करत आहेत.
कोट..
मायणी-विटा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज लहान-मोठे अपघात घडत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभाग हे खड्डे भरेल, अशी आशा होती. मात्र ते खड्डे संबंधित विभागाने न भरल्याने आम्ही हे खड्डे भरण्याचे नियोजन केले व मुरूम व खडीच्या साह्याने तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्थित केले आहेत. तरीही यावर ठोस उपाय होणे गरजेचे आहे.
- योगेश सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी, मायणी पोलीस दूरक्षेत्र
२८मायणी
मायणी-विटा राज्य मार्गावरील खड्डे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मुजवले. (छाया : संदीप कुंभार )