...अखेर जावळी शिक्षक संघात फूट

By Admin | Updated: July 15, 2015 21:16 IST2015-07-15T21:16:50+5:302015-07-15T21:16:50+5:30

निवडणुकीत उमेदवारी नसल्याने नाराज : स्वाभिमानी गट पडणार बाहेर !

Finally, the Jawali teacher's team split up | ...अखेर जावळी शिक्षक संघात फूट

...अखेर जावळी शिक्षक संघात फूट

कुडाळ : जावळी तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र नुकत्याच झालेल्या शिक्षक बँक निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक मातब्बर इच्छुक नाराज झाले.
यावेळी बँकेची उमेदवारी आपल्याच स्वाभिमानी गटाला मिळावी, यासाठी या गटाने दबावतंत्राचाही वापर केला होता. तरीही उमेदवारी न मिळाल्याने स्वाभिमानी गट हा संघावर नाराज राहिला. तर आता हा नाराज गट संघातून बाहेर पडणार असल्यामुळे तालुका शिक्षकसंघात मोठी फूट पडणार, हे निश्चित आहे.
जावळी तालुक्यातील मेढा गटात संघ एकसंध आहे. त्यामुळे आजपर्यंत या गटात समितीला एकदाही बँकेचा उमेदवार निवडून आणता आला नाही. मात्र यावेळी कुडाळ, मेढा मतदारसंघ एकत्रित आल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त
होती.
उमेदवारीमध्ये पंधरा वर्षांपूर्वी डावलल्यामुळे सुरेश शेलार यांनी स्वतंत्र ३५ ते ४० शिक्षकांचा स्वाभिमानी गट तयार केला होता. संघाशी फारकत न घेता या गटाने पंधरा वर्षे आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तरी स्वाभिमानी गटाला शिक्षक संघ उमेदवारी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र यावेळीही संघाने उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेल्या स्वाभिमानी गटातील काही सदस्यांनी बँक निवडणूक निकालानंतर संघाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तर संपूर्ण हा गट संघातून बाहेर पडल्यास जावळी तालुका शिक्षक संघात मोठी फूट पडणार आहे. त्यामुळे पुढील वेळी होणाऱ्या शिक्षक बँक निवडणुकीत संघाला या फुटीचा फटका बसणार, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)

जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यातच संघात फूट
प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक हे जावळी तालुक्यातीलच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच बँकेत संघानी सत्ता मिळविली आहे. मात्र त्यांच्याच तालुक्यात संघावर नाराजी व्यक्त करीत स्वाभिमानी गट संघातून बाहेर पडत आहे. जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यातच संघात मोठी फूट पडत आहे.
सातत्याने स्वाभिमानी गटाला बँक निवडणुकीत डावलून संघाकडून अन्यायच झाला आहे. शिक्षक संघाशी प्रामाणिक राहूनही आमच्या गटावर अविश्वास दाखविला जात आहे. त्यामुळे आम्ही शिक्षक संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
-विजय जुनघरे, शिक्षक

Web Title: Finally, the Jawali teacher's team split up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.