अपंगांच्या तीन योजनांना अखेर मान्यता
By Admin | Updated: November 16, 2014 00:04 IST2014-11-16T00:04:54+5:302014-11-16T00:04:54+5:30
८५ लाखांची तरतूद : कडबाकुट्टी, झेरॉक्स यंत्रणा, तीन चाकी मोटारसायकलचा मार्ग सुकर

अपंगांच्या तीन योजनांना अखेर मान्यता
सातारा : निसर्गाने अन्याय केलेल्या अपंगांचे जगणे सुकर व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना आणल्या जातात. मात्र, सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांसाठी चार योजना आणल्या होत्या. त्या कागदी घोड्यात अडकले होते. या योजनेच्या मान्यतेचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. त्यामुळे ८५ लाखांच्या तीन योजनांचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील अपंगांसाठी काही योजना आणल्या आहेत. यामध्ये पंचायत समितीकडून पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून घेण्यात येणार आहेत. यासाठी कडबाकुट्टी, झेरॉक्स मशीन, तीनचाकी मोटारसायकल तसेच घरकुल योजनांचा समावेश होता. यासाठी एक कोटी ६५ लाखांची तरतूद केली होती. ही योजना पहिल्यांदाच राबविली जात असल्याने तिच्या तांत्रिक मंजुरीसाठी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणीत ही योजना बारगळली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने दि. २९ आॅक्टोबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोईनकर तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी स्वाती इथापे यांनी पुणे आयुक्त कार्यालयात पाठपुरावा केला. यासंदर्भात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतूनही मंजुरी घेण्यात आली.
यामध्ये २५ लाखांची कडबाकुट्टी मशीन, चाळीस लाखांची झेरॉक्स मशीन व वीस लाखांची चारचाकी मोटारसायकल या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)