वाढे येथे दोन गटांत मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:12+5:302021-06-09T04:47:12+5:30
सातारा : तालुक्यातील वाढे येथील साई अभय सोसायटीमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ...

वाढे येथे दोन गटांत मारामारी
सातारा : तालुक्यातील वाढे येथील साई अभय सोसायटीमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारामारीत दोघेजण जखमी झाले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पुरुषोत्तम आनंदराव सूर्यवंशी (वय ३८, रा. साई अभय सोसायटी, वाढे, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार, दि. ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते स्वत: आपल्या मित्रांसमवेत ट्रकवर कव्हर घालत होते. या वेळी संतोष बर्गे हा त्यांच्याजवळ आला आणि ''तुझ्याकडे जो व्हिडिओ आहे तो दाखव,'' असे सांगितले. त्यावर सूर्यवंशी यांनी ''कसला व्हिडिओ दाखवू,'' असा प्रतिप्रश्न करताच संतोष बर्गे याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ''मी फौजी सुभेदार आहे. पोलीस मला काहीच करू शकत नाहीत. तुला काय करायचे ते कर,'' अशी दमदाटी करत पुरुषोत्तम सूर्यवंशी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरु असताना संतोष याचा मुलगा निखिल येथे आला आणि त्याने हातात असलेली बॅट पुरुषोत्तम सूर्यवंशी यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस मारली. यात ते जखमी झाले आहे.
या घटनेनंतर पुरुषोत्तम सूर्यवंशी यांनी त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष बर्गे आणि त्याचा मुलगा निखिल संतोष बर्गे (दोघे रा. बी विंग, साई अभय सोसायटी, वाढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार तोरडमल हे करत आहेत.
दरम्यान, संतोष सदाशिव बर्गे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीच्या पैशांचा गैरव्यव्हार केल्याचा जाब विचारल्याचा रा. आल्याने पुरुषोत्तम सूर्यवंशी, संदीप खाडगे (दोघे रा. साई अभय सोसायटी, वाढे फाटा, सातारा), दत्ता कदम (रा. आरळे, ता. सातारा), सागर (पूर्ण नाव माहीत नाही. रा. साईनिवारा सोसायटी, वाढे फाटा, सातारा) या चौघांनी चिडून जाऊन लाकडी दांडके आणि काठीने संतोष बर्गे यांना मारहाण करून जखमी केले. या चौघांनी संतोष यांच्या पत्नी आणि मुलालाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संतोष यांनी दि. ६ जून रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.