साताऱ्यात पोलिसांसमोरच हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:53+5:302021-02-05T09:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरातील मोळाचा ओढा परिसरातील एका दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यासमोर मारामारी करणाऱ्या दोघांवर ...

साताऱ्यात पोलिसांसमोरच हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरातील मोळाचा ओढा परिसरातील एका दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यासमोर मारामारी करणाऱ्या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय निकम आणि गोपीनाथ बांदलकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यातील निकम हा रिक्षाचालक आहे तर बांदलकर हा गवंडीकाम करत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, हवालदार किशोर आत्माराम जाधव (वय ४८) हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून, ते शनिवार, दि. २३ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर येत होते. यावेळी त्यांना मोळाचा ओढा येेथे असणाऱ्या एका दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर रिक्षाचालक संजय किसन निकम (वय ५०, मु. पो. आंबेदरे, ता. सातारा) आणि गवंडीकाम करणारा गोपीनाथ निवृत्ती बांदलकर (वय ३०, रा. मोळाचा ओढा, सैदापूर, फाळके कॉर्नर, सातारा) हे दोघेजण मारामारी करत एकमेकांना शिवीगाळ करत असल्याचे दिसले. यावेळी पोलीस हवालदार किशोर जाधव यांनी त्यांना शिवीगाळ व मारामारी करु नका, असे सांगितले. तरीही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार निकम करत आहेत.