राष्ट्रवादीने डावललं तरीही लढायचंच !
By Admin | Updated: May 25, 2014 00:33 IST2014-05-25T00:23:26+5:302014-05-25T00:33:19+5:30
पुणे पदवीधर मतदारसंघ : राजेश पाटलांना कार्यकर्त्यांचा आग्रह

राष्ट्रवादीने डावललं तरीही लढायचंच !
कºहाड : पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि. २० जूनला होत आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजप करीत आहे. राष्ट्रवादी त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. पण, त्यांचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. राजेश पाटील-वाठारकर हे त्यातील एक इच्छुक आहेत. वाठारकरांनी यावेळी पक्षाने डावलले तरीही निवडणूक लढवावी, असा आग्रह कºहाड येथे शनिवारी झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकार्यांनी धरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पुणे मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी आठ महिन्यांपूर्वीच जाहीर केली आहे. याउलट प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. राष्ट्रवादीतर्फे राजेश पाटील-वाठारकर, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सांरग पाटील आणि सांगलीचे अरुण लाड स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार निश्चितीसाठी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या खर्या; पण पक्षश्रेष्ठी निर्णयाप्रत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सार्यांच्याच नजरा उमेदवारी घोषणेवर खिळून राहिल्या आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी राजेश पाटील-वाठारकर यांच्या निवासस्थानी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर पहिला हक्क राजेश पाटलांचा आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढावीच! पक्षाने डावलले तर प्रसंगी बंडखोरी करावी, असा आग्रह काहीनी धरल्याचे समजते. स्वत: राजेश पाटील यांनी मात्र कोणतीच भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पद्वीधर मतदारसंघात बंडाळी होणार का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. (प्रतिनिधी)