नियमभंग केल्याप्रकरणी मंगल कार्यालय मालकावर पन्नास हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:22+5:302021-06-05T04:28:22+5:30
फलटण : फलटणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि कडक लॉकडाऊन असताना राजकीय नेतेच नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे ...

नियमभंग केल्याप्रकरणी मंगल कार्यालय मालकावर पन्नास हजारांचा दंड
फलटण : फलटणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि कडक लॉकडाऊन असताना राजकीय नेतेच नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे सिद्ध झाले आहे. मंगल कार्यालयात लग्नाला मनाई असताना श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांच्या बरड (ता. फलटण) येथील मातोश्री मंगल कार्यालयात विवाह समारंभ आयोजित केला होता. याप्रकरणी पन्नास हजार रुपये दंड कार्यालयाला करण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखो रुग्णांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय कार्यक्रम, सभा, मंगल कार्यालयात लग्न करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने कार्यालय विवाह समारंभास उपलब्ध करून दिल्याप्रकरणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांच्या बरड येथील मातोश्री मंगल कार्यालयास बरड ग्रामपंचायतीच्या वतीने पन्नास हजार रुपये दंड करण्यात आला.
फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि कडक लॉकडाऊन असताना राजकीय नेतेच नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीस आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. विवाह समारंभास मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या लोकांची या वेळी चांगलीच पळापळ झाली.