माण बाजार समितीत गोरे बंधूंना ‘फिफ्टी-फिफ्टी’
By Admin | Updated: August 20, 2015 23:01 IST2015-08-20T23:01:13+5:302015-08-20T23:01:13+5:30
सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते.

माण बाजार समितीत गोरे बंधूंना ‘फिफ्टी-फिफ्टी’
दहिवडी : माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोेरे यांच्या गटाचे नऊ, तर शेखर गोरे यांच्या गटाचे आठ उमेदवार विजयी झाले. हमाल व तोलाईमधील एक जागा शेखर गोरे यांनी यापूर्वी बिनविरोध केल्याने दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या आहेत. कृषी प्रक्रिया गटाची जागा रिक्त आहे.
माण बाजार समितीसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी गुरुवारी दहिवडीत झाली. सुरुवातीस व्यापारी मतदारसंघाची मतमोजणी केली. यामध्ये शेखर गोरे यांच्या पॅनेलमधील विजय पोळ, कैलास मोरे हे विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण संघातून दादासाहेब चोपडे, तानाजी मगर हे विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गात दादासाहेब पुकळे विजयी झाले. मागासवर्गीय मतदारसंघात महादेव अवघडे विजयी झाले. हे सर्व शेखर गोरे यांच्या पॅनेलमधील उमदेवार आहेत.सोसायटी मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये आमदार जयकुमार गोरे गटाला पाच, तर शेखर गोरे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या.
यामध्ये आमदार गोरे पॅनेलचे विजयी उमेदवार असे : विजय ओंबासे, चंद्रसेन काटकर, विठ्ठल गायकवाड, संजय जगताप, बाळकृष्ण जगदाळे. तर शेखर गोरे यांच्या पॅनेलमधून दादासाहेब जाधव, बाळासाहेब पवार विजयी झाले.
महिला राखीव मतदार संघातून आमदार गोरे यांच्या पॅनेलच्या शोभा काळेल, प्रभावती जगदाळे विजयी झाल्या. नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातून आमदार गोरे गटाचे अरुण गोरे, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून आमदार गोरे गटाचे चंद्रकांत दडस हे विजयी झाले.
आमदार गोरे यांना सोसायटीमधील नऊ जागा, तर शेखर गोरे यांच्या पॅनेलला तोलाईमधील एक, व्यापारीमधील दोन, ग्रामपंचायतीतील चार, सोसायटीमधील दोन अशा जागा मिळाल्या. (प्रतिनिधी)ं
विद्यमान संचालकाचा पराभव
या निवडणुकीत विद्यमान संचालक शेखर गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा पराभव नवखे उमेदवार विजय पोळ यांनी ११४ मतांनी केला. तर पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र बापूसाहेब माने यांना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. दादासाहेब जाधव यांना बाजार समितीत दुसऱ्यांना संधी मिळाली आहे.